Connect with us

गोवा खबर

भाटले, पणजी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा ही भोगभूमी नव्हे, योगभूमी आहे. हे जगाला समजावे यासाठी मंदिरांमधून धर्मशिक्षण चालू करणे काळाची गरज आहे, असे आवाहन गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांनी केले. भाटले, पणजी येथील श्री सटी भवानी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘मंदिरांचे महत्त्व आणि संस्कृती’ या विषयावर प्रमुख वक्ते या नात्याने जयेश थळी बोलत होते.

याप्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य सहसमन्वयक गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.

जयेश थळी पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात १ सहस्त्र वर्षे मोगल, पोर्तुगीज यांसारख्या आक्रमकांनी राज्य करून हिंदू संस्कृती, मंदिर संस्कृती आदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यांना शक्य झाले नाही. याचे मुख्य कारण मंदिरे आहेत. मंदिरामुळे वातावणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असते. ही मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदींनी प्रखर लढा दिला आहे.

मंदिर संस्कृतीचा वारसा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे दायित्व आपल्याकडे आहे. म्हणून जवळच्या मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा तरी आपण सहकुटुंब बसून उपासना, साधना केली पाहिजे. यामधून मनुष्याला दैवी चैतन्य मिळू शकेल. मंदिर समित्यांनी आपल्या मंदिरात सकाळी योग, स्वसंरक्षण, धर्मजागृतीपर उपक्रम चालू केले पाहिजे.’’

याप्रसंगी गोविंद चोडणकर म्हणाले,‘‘भारतीय संस्कृती विकासाच्या उच्चतम अवस्थेला पोहोचली आहे. आमच्या ऋषीमूनींनी खडतर तपश्चर्येने मानवाला विकासाच्या सर्वाेच्च शिखरावर पोहोचवले आहे; मात्र आज हिंदू ‘सेक्युलर’ झाले आहेत. आज हिंदु तरुण मंदिरात जाऊन नीट नमस्कारही करू शकत नाही. हिंदूंना आज धर्मशिक्षण देणे काळाची गरज आहे. भारताला पुन्हा विकासाच्या सर्वाेच्च स्थानी पोहोचवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेशिवाय पर्याय नाही.’’ सभेचे सूत्रसंचालन सोनम शिरोडकर यांनी केले.