Connect with us

गोवा खबर

टेकड्यांचे रूपांतरण होऊ देणार नाही : मंत्री विश्वजित राणे

Published

on

Spread the love
  • राज्यातील १,११३ मॅनग्रुव्हज क्षेत्रे संरक्षित करण्याचा निर्णय

गोवा खबर : राज्यातील टेकड्यांचे रूपांतरण किंवा हिली क्षेत्रातील अनियंत्रित बांधकामांना यापुढे कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही, असा ठाम निर्धार नगर नियोजन (टीसीपी) खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राणे यांनी स्पष्ट केले की, हिली क्षेत्रात म्हणजेच टेकड्यांच्या परिसरात कोणतेही बांधकाम मंजूर न करण्याचा निर्णय आगामी नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल.

राज्यातील टेकड्या उद्ध्वस्त होऊ नयेत, ही आपली ठाम भूमिका असून माझ्या कारकिर्दीत टेकड्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. “पणजीहून मडगावकडे जाताना अनेक ठिकाणी टेकड्यांवर बांधकामे झालेली दिसतात. मात्र ही सर्व बांधकामे माझ्या कार्यकाळात मंजूर झालेली नाहीत. भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावांना मी मान्यता देणार नाही,” असे राणे यांनी ठासून सांगितले.

याचबरोबर राज्यातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत १,११३ मॅनग्रुव्हज (खारफुटी) क्षेत्रे संरक्षित झोन म्हणून घोषित केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मिठागरांमध्ये जमीन रूपांतरणासही कोणतीही परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या कारकिर्दीत मिठागरांतील जमीन रूपांतरणाचा एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही,” असा दावा मंत्री राणे यांनी केला.

हडफडे येथील नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेवर भाष्य करताना राणे म्हणाले की, त्या ठिकाणी जमीन रूपांतरण त्यांनी दिलेले नव्हते. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयात आल्यानंतरच याबाबत सविस्तर भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हरमल येथील गाजलेल्या जमीन प्रकरणावर बोलताना राणे यांनी सांगितले की, त्या जमिनीचा झोन बदल टीसीपी मंत्री होण्यापूर्वीच कलम १६ (ब) अंतर्गत झाला होता. “टीसीपीने त्या प्रकरणात प्रोविजनल परवानगी कशी दिली, हे मलाही समजले नाही. त्यामुळे मी ती परवानगी रद्द केली आहे,” असे त्यांनी सांगितले.

तुये येथील रुग्णालयाबाबत स्पष्टीकरण

तुये येथील रुग्णालयाच्या संदर्भात बोलताना मंत्री राणे म्हणाले की, अद्याप आरोग्य खात्याने त्या रुग्णालयाचा ताबा घेतलेला नाही. जीएसआयडीसीकडून रुग्णालयातील आवश्यक साधनसुविधा पूर्ण केल्यानंतरच आरोग्य खाते ताबा घेईल. “पुढील २५ वर्षांचा विचार करून आरोग्य सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून त्यांना तुये रुग्णालयाच्या सद्यस्थितीची माहिती दिली आहे,” असे राणे यांनी सांगितले.