Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.

आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.   नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

25 डिसेंबर म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि भारतरत्न महामना मदन मोहन मालवीय या देशातील दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंतीचा गौरवशाली दिवस असतो असे ते म्हणाले. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी भारताची ओळख, एकता आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, असे त्यांनी नमूद केले. या दोन्ही दिग्गजांनी आपल्या अनमोल  योगदानातून देशाच्या जडणघडणीच्या प्रक्रियेवर अमीट  छाप उमटविली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

25 डिसेंबरलाच महाराजा बिजली पासी यांचीही जयंती असल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. लखनौचा प्रसिद्ध बिजली पासी किल्ला या सभेच्या ठिकाणापासून जवळच आहे. महाराजा बिजली पासी यांनी आपल्या पश्चात पराक्रम, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचा वारसा मागे ठेवला आहे, आणि पासी समाजाने तो अभिमानाने पुढे नेला आहे असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. वर्ष  2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनीच महाराजा बिजली पासी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले होते हा योगायोगाही त्यांनी उपस्थिताना  सांगितला. यानिमित्ताने त्यांनी महामना मालवीय, अटल बिहारी वाजपेयी आणि महाराजा बिजली पासी यांना आदरांजलीही वाहिली.

या सभेच्या काही वेळ आधीच आपल्याला राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हे ठिकाण भारताला स्वाभिमान, एकता आणि सेवेचा मार्ग दाखवणाऱ्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे भव्य पुतळे इथे आहेत, मात्र या पुतळ्यांपेक्षाही त्यातून मिळणारी प्रेरणा जास्त मोठी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी याच्या काही ओळीही उद्धृत केल्या. आपले प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक प्रयत्न देशाच्या जडणघडणीसाठी समर्पित असायला हवे, हाच संदेश इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळातून मिळतो असे त्यांनी सांगितले.  विकसित भारताचा संकल्प केवळ सामूहिक प्रयत्नांतूनच पूर्ण करता येणार असल्याची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. या आधुनिक प्रेरणा स्थळाबद्दल पंतप्रधानांनी लखनौ, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. ज्या जमिनीवर हे प्रेरणा स्थळ उभारले गेले आहे, तिथे गेल्या अनेक दशकांपासून 30 एकरपेक्षा जास्त जागेवर कचऱ्याचा डोंगर उभा राहीला होता, मात्र गेल्या तीन वर्षांत या जागेची पूर्ण स्वच्छता करण्यात आल्याची बाब त्यांनी ठळकपणे नमूद केली. या राष्ट्र प्रेरणा स्थळ उभारणीच्या कामाशी जोडलेल्या सर्व कामगार, कारागीर आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळलेल्या प्रत्येकाचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले, तसेच मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण संघाच्या प्रयत्नांचे विशेष कौतुकही केले.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्राला दिशा देण्यात निर्णायक भूमिका बजावली असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, डॉ. मुखर्जी यांनीच भारतात दोन संविधान, दोन निशाण  आणि दोन पंतप्रधान ही तरतूद फेटाळून लावली होती. स्वातंत्र्यानंतरही जम्मू आणि काश्मीरमधील व्यवस्था भारताच्या अखंडतेसाठी एक मोठे आव्हान होते, असे त्यांनी स्पष्ट केले. कलम 370 ची भिंत पाडण्याची संधी त्यांच्या सरकारला मिळाली आणि आज भारताचे संविधान जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्णपणे लागू झाले आहे, असे मोदी यांनी अभिमानाने सांगितले.

पंतप्रधानांनी पुढे आठवण करून दिली की, स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग मंत्री म्हणून डॉ. मुखर्जी यांनी आर्थिक स्वावलंबनाचा पाया घातला आणि देशाला पहिले औद्योगिक धोरण दिले, त्यातूनच भारतातील औद्योगिकीकरणाचा आधार तयार झाला. आज तोच स्वावलंबनाचा मंत्र नव्या उंचीवर नेला जात असून ‘मेड इन इंडिया’ उत्पादने जगभर पोहोचत आहेत, असे त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशात ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही मोठी मोहीम राबवली जात असून त्याद्वारे लघु उद्योग आणि लहान घटकांना बळ दिले जात असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्यासोबतच उत्तर प्रदेशात एक मोठा संरक्षण कॉरिडॉर बांधला जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाहिली, त्याचे उत्पादन आता लखनौमध्ये होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. उत्तर प्रदेशचा हा संरक्षण कॉरिडॉर संरक्षण उत्पादनासाठी जागतिक स्तरावर ओळखला जाईल, तो दिवस आता दूर नाही, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी समारोप करताना उत्तर प्रदेश सुशासन, समृद्धी आणि खऱ्या सामाजिक न्यायाचे मॉडेल म्हणून अधिक उंची गाठत राहो अशी इच्छा व्यक्त केली आणि पुन्हा एकदा राष्ट्र प्रेरणा स्थळाबद्दल अभिनंदन केले.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल  आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री   राजनाथ सिंह,   पंकज चौधरी हे या कार्यक्रमात उपस्थित होते.