-
रघुवीर कुंकळकरांना ऐतिहासिक मताधिक्य
गोवा खबर : ताळगाव जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपचे कमळ पुन्हा एकदा फुलले असून, भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी ३,०२६ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. कुंकळकर यांना तब्बल ७,०२६ मते मिळाली.
काँग्रेसचे विजू दिवकर यांना ४,००० मते, तर ‘आप’च्या दुर्गा सिल्वा यांना केवळ ५४३ मते मिळाली. ताळगावमध्ये झालेल्या कमी मतदानाचा फायदा भाजपलाच झाल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेरात, मंत्री बाबुश मोन्सेरात किंवा भाजपच्या अन्य मोठ्या नेत्यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. मागील दोन वेळा विजयी ठरलेल्या उमेदवारांनाही सहा हजारांचा टप्पा गाठता आला नव्हता. मात्र, कुंकळकर यांनी हा विक्रम मोडीत काढला.
काँग्रेसचे युवा उमेदवार विजू दिवकर यांनी केवळ पक्षचिन्हाच्या जोरावर भाजपला चांगली टक्कर दिल्याचेही दिसून आले. ‘आप’चा प्रभाव मात्र या मतदारसंघात मर्यादित राहिला.