गोवा खबर : भारत देशातील सर्वात महत्त्वाच्या व सुरक्षित, जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी गोवा आज भाजपच्या राजवटीत अभूतपूर्व संकटाला सामोरे जात आहे. सुरक्षितता, स्वच्छ पर्यावरण, सामाजिक सलोखा आणि सुसंस्कृत मूल्यांवर उभी असलेली गोव्याची ओळख एका अकार्यक्षम व भ्रष्ट सरकारकडून जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केली जात आहे.
भाजपच्या कार्यकाळात गोव्यात भ्रष्टाचाराने धोकादायक पातळी गाठली असून, राजकीय संरक्षणाखाली अवैध धंदे बिनदिक्कत वाढले आहेत. बिना परवाना चालवले जाणारे क्लब व व्यावसायिक आस्थापनांमुळे २५ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही केवळ निष्काळजीपणा नसून शासनाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अपयशाचे प्रतीक आहे, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.
शासकीय नोकरभरती प्रक्रियेत सर्वोच्च पातळीवर पैशांची मागणी केल्याचे गंभीर आरोप झाल्यामुळे तरुणांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. वसतिगृहांतील पाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना सरकारच्या उदासीनतेचे द्योतक असून, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले ड्रग्सचे सेवन हे सामाजिक व प्रशासकीय यंत्रणेच्या संपूर्ण अपयशाचे निदर्शक आहे, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गोव्यात जबरी चोरी, बलात्कार, अपहरण आणि हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची अवस्था पूर्णपणे ढासळली असून नागरिक भयभीत वातावरणात जगत आहेत. जे सरकार आपल्या नागरिकांचे संरक्षण करू शकत नाही, त्याला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
भाजप सरकार पर्यावरणाच्या बाबतीतही गोव्याशी विश्वासघात करत आहे. बेफाम कोळसा वाहतुकीमुळे प्रचंड प्रदूषण होत असून गोव्याचा नाजूक पर्यावरणीय समतोल आणि जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे मंत्री आणि आमदार एकमेकांवर उघडपणे भ्रष्टाचाराचे आरोप करत असून, सरकारमधील अंतर्गत कुज, अराजकता आणि अस्थिरता स्पष्टपणे दिसून येत आहे, असे श्री. ठाकरे यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकांवेळी दिलेली मोठमोठी आश्वासने भाजप सरकार पूर्णपणे पाळण्यात अपयशी ठरले आहे. शासन करण्याऐवजी आमदार फोडणे, आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणणे यावरच सरकारचा भर असून, हा लोकशाही आणि जनतेच्या जनादेशावर थेट हल्ला आहे, असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.
ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. विकासाऐवजी सत्तालोलुपता, नियंत्रण आणि स्वार्थी राजकारण हेच भाजप सरकारचे मुख्य अजेंडा बनले आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले.
गोव्याला यापेक्षा चांगले शासन हवे आहे. राज्याचे भविष्य, नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरणाचे संरक्षण आणि तरुणांचे कल्याण यासाठी या भ्रष्ट, जनविरोधी आणि अपयशी भाजप सरकारला जाब विचारला गेला पाहिजे, असे गोव्याचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे म्हणाले.