गोवा खबर : गोवा राज्य सहकारी बँकेने दिव्यांगजन स्वावलंबन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. आर्थिक सहाय्य, उद्योजकता व कौशल्य विकास आणि शिक्षण या बाबींची उपलब्धता वाढवून दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्याच्या कार्यउद्देशाने कार्यरत शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय दिव्यांगजन वित्त आणि विकास महामंडळ (एनडीएफडीसी, भारत सरकार) द्वारे परिवर्तनकारी सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करणारी योजना सुरू करण्यात आली आहे.
क्षमता, स्वातंत्र्य आणि सन्मानजन जीवनमान या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी विकसित ही योजना दिव्यांग व्यक्तींसाठी समावेशक आणि स्वावलंबी परिसंस्था निर्माण करण्याच्या गोवा सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. ४०% किंवा त्याहून अधिक दिव्यंगत्व असलेल्या, १८+ वर्षे वयाच्या (बौद्धिक दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी १४+ वर्षे) आणि युडीआयडी कार्ड/ दिव्यंगत्व प्रमाणपत्र असलेल्या भारतीय नागरिकांसाठी पात्रतानिकषांसह पात्र अर्जदारांना दिव्यांगजन स्वावलंबन योजना विविध लाभ उपलब्ध करते.
दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षमीकरणाचे विविध मार्ग, पर्याय उपलब्ध करणे हा या कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे लाभार्थी व्यक्तीला स्वयंरोजगार सुरू करणे किंवा आपला व्यवसायाचा विस्तार करणे; यासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेणे; व्यवसाय किंवा स्वयंरोजगार क्रियाकलाप सुरू करण्यास किंवा विस्तारित करण्यास, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेणे; पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणे या कामासाठी सदरची कर्जयोजना लाभार्थींना उपयुक्त ठरते. ही योजना गतिशीलता आणि स्वावलंबन वाढीला प्रोत्साहन देणारी आवश्यक साहाय्यक साधन-उपकरण खरेदी करणे किंवा अशा उपकरणांमध्ये सुधारणा घडविण्यासाठीही ही कर्ज योजना लाभ देते.
या योजनेअंतर्गत लाभार्थीला कमाल ₹४० लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये, वार्षिक ५% ते ९% दरम्यानच्या आकर्षक व्याजदरासह आणि कर्ज परतफेड पर्यांयांमध्ये लवचिकता प्रदान करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिव्यांग महिलांना ₹५०,०००पर्यंतच्या कर्जासाठी फक्त १% इतका विशेष सवलत व्याजदर देण्यात आला आहे.
या उपक्रमावर बोलताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “दिव्यांगजन स्वावलंबन योजना ही दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सुलभ आणि परवडणारे कर्ज प्रदान करून, आम्ही प्रत्येक पात्र व्यक्तीसाठी शिक्षण, उद्योजकता आणि कौशल्य विकासाची कवाडे उघडली आहेत. विकास, प्रतिष्ठा आणि संधी मिळवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दिव्यंगत्व अडथळा ठरू नये अशी परिसंस्था निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
या योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रियाबाबत अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी उमेश पिळगांवकर यांच्याशी ८४१२८८३६५७ आणि शेखर नाईक यांच्याशी ८६६८८९७३२५ या क्रमांकावर इच्छुक अर्जदार संपर्क साधू शकतात. तसेच, अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी, इच्छुक नागरिक गोवा सरकारच्या राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाशीही संपर्क साधू शकतात.