गोवा खबर: गोव्यात पर्यटन आणि तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएन्डसी), पर्यटन विभाग, गोवा सरकार आणि सरला एव्हिएशन प्रायव्हेट लिमीटेड यांच्यात महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. या करारामुळे गोव्यात अॅडव्हान्स्ड डिझाईन आणि डेव्हलपमेंट सेंटर उभारले जाणार असून, भविष्यातील पर्यटन आणि वाहतूक व्यवस्थेत व्हिटीओएल (व्हर्टिकल टेकऑफ एण्ड लँडींग) तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
हा करार पऱ्यटन भवन, पाटो येथे झाला, ज्यावेळी माननीय आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन्स आणि पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे, डीआयटीईएन्डसी संचालक श्री. कबीर शिरगावकर, पर्यटन संचालक श्री. केदार नाईक, व इतर अधिकारी उपस्थित होते. सरला एव्हिएशनतर्फे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अॅड्रियन श्मिट उपस्थित होते.
*मंत्री रोहन खंवटे म्हणाले*, “या भागीदारीमुळे गोवा पुढील पिढीच्या मोबिलिटी आणि डिझाईन-आधारित उद्योगांमध्ये पाऊल टाकत आहे. व्हिटीओएल तंत्रज्ञान आणि एरोस्पेस डिझाईनमुळे नवकल्पना, पर्यटन आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रात नवी दालने उघडतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या उपक्रमामुळे गोव्यातील युवकांना स्किलिंग, प्रशिक्षण आणि उच्च दर्जाची रोजगार संधी मिळतील. गोव्यात येणारे प्रत्येक नवे तंत्रज्ञान हे इथल्या लोकांच्या फायद्यासाठी असावे, हेच आमचे ध्येय आहे.”
सरला एव्हिएशन गोव्यात दीर्घकालीन हब तयार करणार आहे, जिथे संशोधन, डिझाईन, चाचण्या आणि प्रोटोटाइप तयार होतील. कंपनी ६-सीटर इलेक्ट्रिक ई- व्हिटीओएल विमान विकसित करत आहे, जे स्वच्छ, शांत आणि ट्रॅफिकमुक्त हवामानात उडणारी मोबिलिटी देईल.
*करारामध्ये गोव्यात व्हिटीओएल-आधारित एअर मोबिलिटी सुरू करण्याचे महत्त्वाचे टप्पे नमूद केले आहेत:*
● हॉटेल्स आणि पर्यटन उद्योगासोबत चर्चा करून व्हिटीओएल सेवांचा पर्यटन अनुभवात समावेश
● गोव्याची पहिली अर्बन एअर मोबिलीटी (युएएम) पॉलिसी तयार करणे
● विमानतळ ते रिसॉर्ट्स हवाई मार्ग तयार करणे
● गोव्यातील व्हिटीओएल सेवा पुरवणाऱ्या स्थानिक ऑपरेटरला समर्थन देणे
या सर्व उपक्रमांमुळे गोवा भारताचे पहिले कोस्टल एरीयल मोबिलीटी स्टेट होण्यासाठी वाटचाल करणार आहे.
*डीआयटीईएन्डसी संचालक श्री. कबीर शिरगावकर म्हणाले*, “या भागीदारीमुळे प्रगत एरोस्पेस डिझाईन गोव्याच्या नवकल्पना क्षेत्रात येत आहे. धोरणात्मक समर्थन, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळामुळे गोवा व्हिटीओएल सारख्या तंत्रज्ञानासाठी आदर्श ठिकाण बनू शकतो.”
*पर्यटन संचालक श्री. केदार नाईक म्हणाले*, “पर्यटन वेगाने बदलत आहे आणि गोवा भविष्यकालीन मोबिलिटी स्वीकारण्यासाठी तयार आहे. व्हिटीओएल सेवा मिळाल्यास समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि हेरिटेज स्थळांमध्ये जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास शक्य होईल. यामुळे पर्यटकांचा अनुभव उंचावेल.”
*सरला एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अॅड्रियन श्मिट म्हणाले*, “गोवा सरकारचे पाठबळ आणि खुले धोरण आम्हाला प्रेरणा देते. २०२९ पर्यंत आम्ही गोव्यात प्रगत एअर मोबिलिटी सेवा सुरू करण्याची योजना आखत आहोत. गोव्यातील जीवनमान आणि कामासाठी योग्य वातावरणामुळे जागतिक दर्जाचे टॅलेंट येथे आकर्षित होईल.”
ही भागीदारी गोव्यातील तंत्रज्ञान, सर्जनशील उद्योग आणि पर्यटन क्षेत्रांना नवी दिशा देणार असून, युवकांसाठी भविष्यातील रोजगार आणि प्रशिक्षणाच्या मोठ्या संधी निर्माण करणार आहे.