गोवा खबर: २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान ओडिशा राज्यात आयोजित राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट अजिंक्यपद २०२५मध्ये गोवा राज्याच्या संघाने प्रतिष्ठित मुख्यमंत्री करंडक जिंकून इतिहास रचला. या राष्ट्रीय स्पर्धेत ओडिशा, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांच्या संघांनी भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या व लोकप्रिय असलेल्या या क्रीडाप्रकारातील स्पर्धेत सर्वोच्च सन्मानासाठी स्पर्धा करत होते.
छत्तीसगडविरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात, गोवा संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. सामन्याचे मुख्य आकर्षण म्हणजे निकलेश पेडणेकरने केलेली शानदार नाबाद ६५ धावांची खेळी. त्याच्या योगदानामुळे गोवा संघाला संस्मरणीय विजय मिळाला. हा विजय राज्याच्या दिव्यांग क्रीडा चळवळीसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. तसेच या कामगिरीतून भारतातील व्हीलचेअर क्रिकेटसाठी एक नवीन मापदंड स्थापित झाला आहे.
गोव्यात आगमन झाल्यावर विजयी संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव श्री. ताहा हाझिक यांनी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून विजयी संघाचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गोवा राज्य व्हीलचेअर क्रिकेट संघाने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमागे राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने दिलेला अढळ पाठिंबा आणि आणि या खेळाडूंनी बजावलेल्या कामागिरीबाबतचा सार्थ अभिमान आयुक्त कार्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतून अधोरेखित झाला.
विजेत्या संघाचे स्वागत करताना राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, “गोव्याचा विजय हा केवळ क्रीडा कामगिरीपुरता मर्यादित नाही. प्रत्येक गोमंतकीयासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपल्या व्हीलचेअर क्रिकेट संघाने असाधारण दृढनिश्चय, शिस्त आणि प्रतिभा यांचे संपूर्ण स्पर्धेत प्रदर्शन घडवत ही कामगिरी साधली आहे. खेळाडूंना समान संधी, पाठिंबा आणि मान्यता मिळाल्यास समावेशक क्रीडा परिसंस्था काय साध्य करू शकते याचेच द्योतक म्हणजे हे जेतेपद होय. टीम गोवाचे हे यश देशभरातील असंख्य दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षेने प्रत्येक क्षेत्रात काम करण्यास प्रेरणा देत राहणार आहे.”
विजेत्या संघाचे मुक्तकंठाने अभिनंदन करताना विजेत्या संघाचे मार्गदर्शक आणि राज्य पॅरा-क्रिकेट संघाचे सदस्य विशांत नागवेकर म्हणाले, “व्हीलचेअर क्रिकेटला दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मी गोवा सरकार आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे मनापासून आभार मानतो. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट दरम्यान संधी म्हणून सुरू झालेली ही स्पर्धा गेल्या दोन वर्षांमध्ये सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि क्रीडाकौशल्याला परिपूर्ण
बनवण्याच्या शिस्तबद्ध प्रवासात रूपांतरित झाली आहे. या पाठिंब्याने आम्हाला आव्हानांवर मात करण्यास प्रेरणा मिळाली आणि त्याचाच परिपाक म्हणजे ओडिशामध्ये आम्ही ही अभिमानास्पद कामगिरी बजावू शकलो. दिव्यांग खेळाडूंना नियमित सराव करता यावा, यासाठी अधिक सुलभ मैदाने व सुविधा उपलब्ध करत या खेळाडूंना नियमित पाठबळ देत राहण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा आम्हाला करावीशी वाटते. सुलभ क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास दिव्यांग खेळाडूंना अडथळ्यांशिवाय प्रशिक्षण घेता येईल आणि गोवा राज्यासाठी भविष्यात असे अनेक गौरवास्पद क्षण अनुभवता येतील.”
ओडिशा येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गोवा व्हीलचेअर क्रिकेट संघात प्रतिभावान दिव्यांग खेळाडूंचा सहभाग होता. या खेळाडूंनी धैर्य, कणखरपणा, लवचिकता, समूहभावना या गुणकौशल्यांचे संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रदर्शन केले. संघाच्या फलंदाजीची धुरा गौरेश मराठे, महेश पगडाला, हणमंत, नागेश रेडकर, निकलेश पेडणेकर, स्टॅनी डिसूझा (कर्णधार), मोझेस रॉड्रिग्ज आणि सय्यद मोसिक अहमद यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या एकत्रित खेळाने प्रत्येक सामन्यात संघाचे पारडे वरचढ राखणे शक्य झाले. शिवप्पा कराडी, संतोष आर. गावस आणि मिथुन शिरोडकर या खेळाडूंनी संघाच्या कामगिरीस बळकटी देत जेतेपदाकडे वाटचाल कायम राखण्याची भूमिका बजावली. या खेळाडूंनी संघभावनेला सर्वोच्च स्थान देत अभिमान, दृढनिश्चय आणि अतूट क्रीडा भावनेने गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करते जेतेपद पटकावून दिले.
भारताच्या समावेशक क्रीडा चौकटीच्या सामूहिक विकासाचा परिणाम म्हणजे ही स्पर्धा ओळखली जाणार आहे. राज्यामध्ये दिव्यांगजनांमधील प्रतिभेचा विकास करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावरील पॅरास्पोर्ट्समध्ये आपले स्थान आणखी ठळक करण्याबाबत गोवा राज्याने बाळगलेली वचनबद्धता या जेतेपदातून अधोरेखित होत आहे.