Connect with us

गोवा खबर

जीटीडीलीतर्फे जागतिक ख्यातीचे नृत्यनाट्य ‘राम’ चे २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सादरीकरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) तर्फे गोव्यात भारतातील सर्वाधिक मान मिळालेल्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगांपैकी एक, प्रसिद्ध नृत्यनाट्य ‘राम’ सादर होणार आहे. हा कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी वास्को येथील रवींद्र भवन, बायणा, आणि ३० नोव्हेंबर रोजी पणजी येथील कला अकादमी येथे आयोजित करण्यात आला आहे.

जीटीडीसी चे अध्यक्ष केदार नाईक म्हणाले, “गोवा ‘राम’ सारखा प्रतिष्ठित आणि पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनाला भिडलेला नाट्यप्रयोग आयोजित करत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे अशा दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांद्वारे गोव्यातील लोकांना समृद्ध कलानुभव देणे.”

जीटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक  कुलदीप अरोलकर म्हणाले, “भारताची सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि ती साजरी करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यास गोवा पर्यटन अभिमानाने पुढाकार घेत आहे. जागतिक स्तरावर गाजलेल्या ‘राम’ नृत्यनाट्याचे आयोजन ही आमची सांस्कृतिक बांधिलकी अधिक मजबूत करणारी बाब आहे.”

श्रीराम भारतीय कला केंद्र हे भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्थांपैकी एक असून शास्त्रीय नृत्य, संगीत आणि अभिनयकला यांचा प्रसार करण्यासाठी ओळखले जाते. अनेक दशकांपासून त्यांनी अनेक कलारूपांचे संवर्धन केले असून ‘राम’ हा त्यांचा सर्वात प्रतिष्ठित आणि जागतिक मान्यता मिळालेला नाट्यप्रयोग आहे, जो लाखो लोकांनी पाहिला आहे.

हा उपक्रम गोव्याच्या सांस्कृतिक वातावरणाला बळकटी देण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. गोवा पर्यटन विभाग नेहमीच भारताच्या समृद्ध कला–वारशाचा सन्मान करणारे उपक्रम राबवत असून गोमंतकीयांना जागतिक दर्जाचे कार्यक्रम अनुभवण्याची संधी देत आहे.

या कार्यक्रमाला गोवा सरकारचा पूर्ण पाठिंबा असून, हा उपक्रम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जीटीडीसी तर्फे आयोजित ‘राम’ नृत्यनाट्य गोव्याची कला, संस्कृती आणि आदरातिथ्य दाखवण्याची मोठी संधी ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर रोजी गोव्यात आगमन करून काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पार्टगाळी जीवोत्तम मठात भगवान रामांची ७७ फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जीटीडीसी तर्फे होणारा हा ‘राम’ नाट्यप्रयोग सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

नृत्यनाट्याचे आयोजन शक्य करण्यासाठी रवींद्र भवन, वास्को आणि कला अकादमी, पणजी यांनी आपले सभागृह उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून राज्यभरातील रसिकांना हा अप्रतिम नाट्यअनुभव सहज उपलब्ध होईल.

प्रवेश विनामूल्य असून प्रवेश बँडच्या माध्यमातून ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर देण्यात येईल.

जीटीडीसी आणि पर्यटन विभागाने गोमंतकीय जनतेस या भव्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. गोवा कला, संस्कृती आणि वारशाचा केंद्रबिंदू म्हणून आपली ओळख अधिक बळकट करत आहे.