Connect with us

गोवा खबर

गोवा आणि नॉर्वेमध्ये तंत्रज्ञान, पर्यटन आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये सहकार्याच्या नव्या संधींची चर्चा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याने आज आपले आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत केले आहेत. नॉर्वेचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ गोव्यात भेटीस आले आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएन्डसी) आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रावंडटेबल बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत तंत्रज्ञान, पर्यटन, कौशल्यविकास आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमीतील सहकार्याच्या संधींवर चर्चा झाली.

मा. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे, डीआयटीईएन्डसी संचालक कबीर शिरगावकर, संयुक्त संचालक डॉ. मिलिंद साखरदांडे, जीटीडीसी चे जीएम (मार्केटिंग) डॉ. गॅविन डायस, स्टार्टअप एन्ड आयटी प्रमोशन सेल चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत, तसेच गोव्या मधील किलोवॉट कंपनीचे प्रतिनिधी कॅलेब फर्नांडिस व जुदाह बेन फर्नांडिस, हे मान्यवर बैठकीला उपस्थित होते

तसेच नॉर्वेच्या प्रतिनिधी मंडळात ट्रॉन्ड स्कुंडबर्ग (एनआयसीसीआय), क्रिश्चन एच. एंग (नॉर्वेजियन सायबरसिक्युरिटी क्लस्टर), मोनिका स्कजेलन-लार्सेन (Gjøvikregionen Utvikling), ब्योर्न अस्पॉय (स्मार्ट फार्म एएस), शेरालिन रोचा (नॉर्डीक इन्टेन्ट), आदित्य प्रभूगावकर (किलोवॉट), यश्तेश शिरोडकर (कोनस्ट्रक्ट) आणि प्रभा (एनआयसीसीआय संचालक).

मंत्री रोहन खंवटे गोव्याच्या नव्या विकास मॉडेलवर प्रकाश टाकत म्हणाले, “गोवा तंत्रज्ञान, क्रिएटिव्हिटी आणि टिकाऊ पर्यटन यांना एकत्र आणणारे एक आधुनिक इकोसिस्टम तयार करत आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर, एआय कौशल्यविकास कार्यक्रम आणि मजबूत स्टार्टअप धोरणामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याला अनेक नवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. पर्यटन क्षेत्रातही आम्ही तंत्रज्ञान, अनुभवाधारित प्रवास आणि शाश्वत पद्धती यांचा अधिक वापर करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, गोव्याकडे सक्षम आणि वाढती प्रतिभावंत युवा पिढी असल्यामुळे जागतिक सहकार्याच्या संधी वाढतात आणि या भागीदारीचा पहिला लाभ गोव्यातील नागरिकांना रोजगार, संधी आणि विकासाच्या रूपाने मिळायला हवा.

नॉर्वेजियन सायबरसिक्युरिटी क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश्चन एच. एंग म्हणाले, “नॉर्वे जगातील सर्वाधिक डिजिटाइज्ड देशांपैकी एक आहे. नवीकरणीय ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत तंत्रज्ञानात त्यांची मजबूत पकड आहे. आता नॉर्वे भारताकडे आणि विशेषतः गोव्याकडे, जागतिक प्रतिभेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्केलेबल सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी पाहत आहे.”

ते म्हणाले की गोव्याचा स्वच्छता, टिकाऊ पर्यटन, हरित मोबिलिटी यावर असलेला भर नॉर्वेच्या प्राधान्यांशी सुसंगत आहे. त्यांनी अ‍ॅक्वाकल्चर तंत्रज्ञान हेही एक प्रमुख सहकार्य क्षेत्र असल्याचे सांगितले.

स्टार्टअप एन्ड आयटी प्रमोशन सेल चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत यांनी गोव्याची आयटी पॉलिसी, स्टार्टअप अनुकूल वातावरण, सर्जनशील तंत्रज्ञान क्षेत्र यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी क्रिएटिव्ह-टेक, डिझाइन-आधारित इनोव्हेशन, कौशल्यविकास आणि भविष्याभिमुख इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गोवा–नॉर्वे सहकार्याची मोठी क्षमता असल्याचे सांगितले.

जीटीडीसी चे जीएम (मार्केटिंग) डॉ. गॅविन डायस यांनी गोव्याच्या पर्यटन धोरणावर सविस्तर सादरीकरण केले. गोव्याचा सांस्कृतिक वारसा, इथली जैवविविधता, खाद्यसंस्कृती, आयुर्वेद, वेलनेस आणि मेडिकल टुरिझम तसेच हॉटेल व्यवसायात गुंतवणूक, अनुभवाधारित पर्यटन, चार्टर फ्लाइट्स, साहसी पर्यटन, संशोधन सहकार्य यावर त्यांनी भर दिला.

नॉर्वेजियन प्रतिनिधींनी विद्यापीठे व कॉलेजेससोबत भागीदारी, प्रतिभा देवाणघेवाण कार्यक्रम, संशोधन संस्थांशी सहकार्य, डायव्हिंगसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे, व्यवसाय नेटवर्क मजबूत करणे आणि अ‍ॅक्वाकल्चर, मरीन टेक्नॉलॉजी व स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात संयुक्त प्रकल्प या क्षेत्रांमध्ये सहकार्याची इच्छा व्यक्त केली.

गोवा तंत्रज्ञान, कौशल्यविकास, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज आणि टिकाऊ विकासाच्या दिशेने प्रगती करत असताना, नॉर्वेमधील या प्रतिनिधीमंडळासोबतचा संवाद अत्यंत फलदायी ठरला. यामुळे गोवा जागतिक सहकार्याला तयार असल्याचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनाही गोव्याच्या भविष्यातील शक्यता आशादायक वाटत असल्याचे स्पष्ट झाले.