~ “फेस्टिव्हल्स ऑफ गोवा” हे प्रदर्शन गोव्याची संस्कृती, बदलती ओळख आणि विविधता अनुभवण्याचा एक अनोखा मार्ग आहे, असेसंग्रहालयाच्या संचालिका शारदा केरकर यांनी सांगितले.
गोवा खबर :पिळर्ण येथील म्युझियम ऑफ गोवा (मोग) मध्ये ‘फेस्टिव्हल्स ऑफ गोवा’ या विशेष प्रदर्शनात ९० पेक्षा जास्तकलाकारांनी १०० हून अधिक कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. हे प्रदर्शन ९ नोव्हेंबरपासून १८ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू असून संग्रहालयाच्या१० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे.
‘फेस्टिव्हल्स ऑफ गोवा’ या मोठ्या विषयाखाली चार वेगवेगळे शो एकाच वेळी सादर केले आहेत. फोटोग्राफी, समुदाय सहभाग असलेलीइंस्टॉलेशन्स, मल्टिमीडिया कला आणि मुलांचे कला प्रदर्शन या माध्यमातून गोव्याचा इतिहास, धार्मिक विविधता आणि परंपरांचा प्रवास दाखवला आहे. हे प्रदर्शन गोव्याच्या संस्कृतीचे आरसे आणि नकाशा दोन्ही ठरले आहे.
मोगच्या संचालिका शारदा केरकर म्हणाल्या, “या १० वर्षांच्या निमित्ताने आम्ही गोव्याचे सण, त्यांची विविधता आणि त्यामागची संस्कृती लोकांसमोर आणू इच्छितो. या प्रदर्शनात गोव्याचे ३० पेक्षा अधिक सण दाखवले गेले आहेत. हे फक्त सणांचे संग्रहालय नाही, तर गोव्याचीओळख आणि विविधता अनुभवण्याचे ठिकाण आहे.”

या प्रदर्शनात रामदास गडेकर, विराज नाईक, चैताली मोराजकर, हर्षदा केरकर, सिद्धेश चारी, सोनिया रॉड्रिग्स सभरवाल, व्हेरोडिना फेराओ देसूझा, आसावरी गुरव, डॅनिएल डिसूझा, नलिनी एल्विनो दि सूझा आणि इतर अनेक प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग आहे.
सुबोध केरकर म्हणतात, “कलेचे काम म्हणजे ‘आपण’ आणि ‘इतर’ यांच्यातील भिंती मोडणे. कलेच्या दुनियेत विभाजन नसते. भारतात १.४ अब्ज लोक असून फार कमी लोक आधुनिक कलेशी जोडलेले आहेत. म्हणूनच कला सर्वांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून मोग तयार झाले.”
व्हेर वी गॅदर: नारकासूरची कलाकृती, क्रोशेने बनवलेले ख्रिसमस ट्री आणि भलीमोठी माटोळी, समुदायाने तयार केलेल्या कलेची ताकद दाखवणारे प्रकल्प. फेस्टीव्हल्स एज प्लेग्रावंड: मुलांसाठी खास कला प्रदर्शन, मुलांच्या नजरेतून सण आणि सर्जनशीलतेचे दर्शन. सायड बाय सायड: ओळखीचे आणि कमी ओळखीचे सण कलाकृतींच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न. सीन/अनसीन: सणांमागील मेहनत,भावनात्मक तयारी आणि समर्पण यांचे फोटोग्राफीद्वारे दर्शन. प्रिव्ह्यू नायटमधे प्रसिद्ध गायिका सोनिया शिरसाट आणि ‘रोझ आंगोन’ बँडने खाससंगीत कार्यक्रम सादर केला.
मोग चे निलांकुर दास म्हणाले, “दहा वर्षांपूर्वी इथे एक स्वप्न रुजले, आवाजांचे संग्रहालय तयार करण्याचे. आज ते स्वप्न जिवंत झाले आहे आणिकलाकार, विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या भेटीचे ठिकाण बनले आहे.”
२०१५ पासून मोग ने ५०० पेक्षा जास्त कलाकारांसोबत काम केले आहे आणि ६०० पेक्षा जास्त प्रदर्शन आणि कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरवर्षी ७०,००० पेक्षा अधिक पर्यटक आणि १२,००० विद्यार्थी येथे भेट देतात.
‘फेस्टिव्हल्स ऑफ गोवा’ प्रदर्शन ९ नोव्हेंबरपासून १८ जानेवारीपर्यंत मोग, पिळर्णे येथे पाहता येईल.