गोवा खबर : वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने शुक्रवारी (दि. ७) राज्यातील सर्व शाळा, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम्’ हे गीत एकाच वेळी वाजवले जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी रवींद्र भवनमध्ये आयोजित ‘संगीत आनंदमठ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सभापती डॉ. गणेश गावकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आणि नाटक दिग्दर्शक रवींद्र सातपुते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “वंदे मातरम् हे गीत ऐकताना देशभक्तीची स्फूर्ती जागृत होते. हे गीत देशासाठी जगण्याची प्रेरणा देते. विकसित भारतासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.”
दामू नाईक म्हणाले की, या गीताला भारताच्या इतिहासात मोलाचे स्थान आहे. “स्वातंत्र्यसेनानींनी या गीताच्या स्फूर्तीने देशासाठी बलिदान दिले. त्यामुळे या गीताचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.