Connect with us

गोवा खबर

ढगांवरील संशोधनासाठी पुण्यात सेंटर ऑफ एक्सेलन्स: एम. रविचंद्रन

Published

on

Spread the love


भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या वतीने 11व्या WMO हवामान बदल विषयक शास्त्रीय परिषदेचे आयोजन

 

 

 गोवा खबर:हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे, या क्षेत्रासाठी देशभरात सटेलाईट उभे करणे, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतात विकसित करणे यासाठी केंद्रीय मंत्रालय प्रयत्नशील आहे, त्या दृष्टिकोनातून एक पाऊल म्हणून भविष्यात ढगांवरील संशोधनासाठी पुण्यात सेंटर ऑफ एक्सेलन्सची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी आज दिली.

 

भारतीय उष्णप्रदेशिय हवामानशास्त्र संस्थेच्या वतीने (आयआयटीएम) आयोजित 11व्या WMO हवामान बदल विषयक शास्त्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सदर परिषदेचे आयोजन 3 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयआयटीएम, पुणे येथे करण्यात आले आहे.

सदर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे अध्यक्ष अब्दुल्ला मँडोस, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा आणि भारतीय उष्णप्रदेशिय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात एम. रविचंद्रन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम अभियान हाती घेतले असून 2047 पर्यंत विकसित भारतासह देशाला क्लायमेट स्मार्ट नेशन बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक हवामानविषयक अंदाज वर्तवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सदर परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी होणार असून हवामान शास्त्र बदलाचा अभ्यास, संशोधन, विकसित तंत्रज्ञान याविषयी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. यामध्ये हवामान बदलाशी संबंधित 10 प्रमुख विषयांवर 16 सत्रे असतील. 78 विद्यार्थी, 148 भारतीय शास्त्रज्ञ आणि 150 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह 400 हून अधिक जण सहभागी होणार आहेत. क्लाउड फिजिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि तज्ञांचे मुख्य भाषण आणि नियमित व्याख्याने, तसेच हवामान बदल संशोधनाच्या आव्हानात्मक विषयांवर पोस्टर सत्रे आणि पॅनेल चर्चा आयोजित केल्या जातील.