Connect with us

गोवा खबर

१४व्या ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धा २०२५ साठी गोवा सज्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (जीएफआय), क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, गोवा आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १४वी ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात येत आहे.

ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत, दररोज सकाळी १० वाजल्यापासून, पेडे इनडोअर स्टेडियम, करासवाडा, म्हापसा, गोवा येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत आशियातील उत्कृष्ट ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्ट्स एकत्र येऊन आपली कौशल्ये प्रदर्शित करतील.

भारतामध्ये प्रथमच या आशियाई स्तरावरील ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन होत असून, हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. या आयोजनामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत होणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून संतोश सुखदेवे, आयएएस, सचिव (क्रीडा), गोवा सरकार; डॉ. अजय आर. गावडे, संचालक, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि कार्यकारी संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरण; मिस आयगुल ड्यूकेनबायेव्हा, एजीयु टेक्निकल प्रेसिडेंट; सुधीर मित्तल, अध्यक्ष, जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डॉ. सी. प्रभाकर, उपाध्यक्ष, जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आंतरराष्ट्रीय अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत. जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने गोव्याचे आदरणीय क्रीडामंत्री रमेश तावडकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगातील उत्कृष्ट दर्जाचे प्रदर्शन, स्पर्धा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होणार आहे. या माध्यमातून ताकद, कलात्मकता आणि टीमवर्कचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचे हे प्रतीक ठरणार आहे.

स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना संतुलन, समन्वय आणि सर्जनशीलतेचे अद्भुत प्रदर्शन पाहायला मिळेल. खेळाडू अत्यंत अवघड हालचाली आणि जोखमी च्या कृतींमधून आपली कसब दाखवतील. या स्पर्धेत आशियातील सर्वोत्तम खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी होत असल्याने ही गोव्याच्या इतिहासातील एक भव्य आणि रोमांचक क्रीडा मेजवानी ठरणार आहे.

*मिस आयगुल ड्यूकेनबायेव्हा, एजीयु टेक्निकल प्रेसिडेंट, म्हणाल्या, ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धा एकतेचा, कलात्मकतेचा आणि खेळातील उत्कृष्टतेचा उत्सव आहे. भारत आणि गोवा या स्पर्धेचे आयोजन करत आहेत, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. ही स्पर्धा तरुण जिम्नॅस्ट्सना प्रेरणा देईल आणि संपूर्ण आशियात या क्रीडाप्रकाराला अधिक बळकटी देईल.

सुधीर मित्तल, अध्यक्ष, जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, म्हणाले, १४वी ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धा आयोजित करणे हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामुळे आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. गोव्याची आधुनिक पायाभूत सुविधा आणि क्रीडाप्रेमी संस्कृती यामुळे हे आयोजन आणखी विशेष ठरणार आहे.

 डॉ. सी. प्रभाकर, उपाध्यक्ष, जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणाले, ही स्पर्धा केवळ विजयाची नाही, तर टीमवर्क, शिस्त आणि समर्पणाचा उत्सव आहे. ही स्पर्धा भारतातील तरुण जिम्नॅस्ट्सना प्रेरणा देईल आणि या खेळाच्या भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करेल.

१४वी ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धा २०२५ हा भारताच्या क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. संपूर्ण आशियातून खेळाडू आणि प्रेक्षक गोव्यात एकत्र येण्यासाठी सज्ज आहेत, आणि या अविस्मरणीय स्पर्धेसाठी गोवा उत्साहाने उजळून निघाला आहे.