-
सांताक्रूझ येथे ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वितरण कार्यक्रम
गोवा खबर : आमच्या सरकारने जेव्हा माझे घर योजना जाहीर केली, तेव्हा विरोधकांनी विधानसभेत आणि बाहेर तीव्र विरोध केला. आता निवडणुकीत तेच लोक तुमच्या दारात येतील, तेव्हा त्यांना योग्य ती अद्दल घडवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सांताक्रूझ येथे रविवारी माझे घर योजनेचे अर्ज वितरण मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रुदोल्फ फर्नांडिस, जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, जिल्हाधिकारी अंकित यादव आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेमुळे सर्वांची घरे कायदेशीर होणार असून, यात लोकांचे हित आहे. बेकायदेशीर घरे सरकार पाडत नाही; आदेश न्यायालयाचे असतात आणि तक्रार तुमचेच शेजारी करतात.
त्यांनी सांगितले की, माझे घर योजनेची प्रक्रिया अगदी सोपी आहे. २४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी रहिवासी दाखला असलेल्यांची घरे कायदेशीर होणार आहेत. १९७२ पूर्वी सर्वेक्षणात नोंद असलेली घरे, तसेच २० कलमी कार्यक्रमांतर्गत असलेली घरे आणि कोम्युनिदाद जागेवरील ४०० चौ.मी. पर्यंतची घरेही नियमित केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारचा उद्देश प्रत्येक गोमंतकवासीयाला त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळवून देणे हा आहे.