Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या शाश्वत सागरी रोडमॅपचे मुंबईत अनावरण : मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबई येथे झालेल्या ‘भारतीय सागरी सप्ताह २०२५’ मध्ये गोव्याच्या शाश्वत सागरी विकास रोडमॅपचे अनावरण केले. या कार्यक्रमात गोव्याच्या सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी आणि विकासासाठी घोषणा करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील जलमार्गांच्या विकासासाठी २०० कोटी रुपये आणि मुरगाव बंदरात एलएनजी (LNG) सुविधेसाठी तब्बल ३,५०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय २ मेगावॅटचा सौर प्रकल्प आणि गोवा मेरीटाइम बोर्डाच्या कार्यांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी, तसेच केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंत म्हणाले, गोव्याला सागरी वारशाची परंपरा आहे. आता आम्ही हिरव्या इंधनावर आधारित जहाजे, हायब्रिड प्रोपल्शन आणि सिंगल-विंडो शिपयार्ड क्लिअरन्स प्रणाली आणण्याचा विचार करीत आहोत. यामुळे गुंतवणूक वाढेल आणि गोव्याच्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्र्यांनी जहाजबांधणी आणि सागरी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदारांना गोव्यात गुंतवणुकीचे खास निमंत्रण दिले. सागरमाला, पीएम गती शक्ती आणि सागरी व्हिजन २०३० अंतर्गत केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्याच्या सागरी क्षेत्रात नव्या शक्यता निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.