गोवा खबर : रेईश मागूस परिसरात नवा कॅसिनो आणण्यासाठी सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे. मांडवी नदीत आधीच सहा कॅसिनो जहाजे कार्यरत असताना आता आणखी एक कॅसिनो आणण्याचा डाव रचला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
ताम्हणकर म्हणाले, सरकार एका बाजूने सांगते की नवे कॅसिनो आणले जाणार नाहीत, पण दुसरीकडे मांडवी नदीतील विद्यमान कॅसिनोंना मुदतवाढ दिली जाते. आता तर रेईश मागूस येथे नियम मोडून नवे जहाज आणण्याची तयारी सुरू आहे.
त्यांनी सांगितले की, सदर जहाजाला या ठिकाणी तात्पुरती नांगरण्याची परवानगी देण्यात आली आहे. आधीच सहा कॅसिनो जहाजे असताना आणखी एका जहाजाची गरजच काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जर नवा कॅसिनो आणणार नसतील, तर जुने जहाजच त्या जागी ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
ताम्हणकर यांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, नियमांनुसार जहाजाची लांबी २० मीटर आणि रुंदी १६ मीटर असावी लागते. मात्र प्रत्यक्षात आणले जाणारे जहाज ११२ मीटर लांबीचे आणि २८ मीटर रुंदीचे आहे. हे नियमांना बगल देणे आहे. त्यांनी यामुळे पर्यावरण आणि समुद्री जीवसृष्टीवर धोका निर्माण होईल असा इशाराही दिला.
सरकारने या प्रकरणात भूमिका स्पष्ट करावी. जर नवा कॅसिनो आणला गेला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ताम्हणकर यांनी दिला.