Connect with us

गोवा खबर

गोव्यातील वॉटरस्पोर्ट्स अधिक सुबक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी घेतली बैठक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी गोव्यातील वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीस कळंगूटचे आमदार मायकेल लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, पर्यटन संचालक केदार नाईक, बंदर कप्तान ऑक्टाविओ अँटनी रॉड्रिग्स, पोलिस अधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि वॉटरस्पोर्ट्स संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना मंत्री खंवटे म्हणाले, “वॉटरस्पोर्ट्स हे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक गोवेकर अनेक पिढ्यांपासून या व्यवसायात आहेत. बदलत्या काळात नियमबद्धता आणि पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देता येईल.”

त्यांनी सांगितले की सरकार पारंपरिक वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांना पाठबळ देण्यास कटिबद्ध आहे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दर एकसारखे ठेवण्याबाबत त्यांनी सांगितले की, “वॉटरस्पोर्ट्स संघटनांनी सुचवलेले दर शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उत्तर ते दक्षिण गोव्यात एकसारखे दर लागू केले जातील, ज्यामुळे एकसमानता राखली जाईल.”

बेकायदेशीर वॉटरस्पोर्ट्स पॅकेज विकणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींबाबत मंत्री खंवटे म्हणाले, “सध्या काही ऑनलाईन व ऑफलाईन ट्रॅव्हल एजन्सीज परवानगीशिवाय वॉटरस्पोर्ट्स पॅकेज विकत आहेत. पर्यटन खाते स्थानिक पंचायत व संघटनांसह मिळून अशा प्रकारांवर कारवाई करेल, परंतु पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अशा एजन्सींना वॉटरस्पोर्ट्स पॅकेज विकण्यास बंदी घालण्यात येईल.”

त्यांनी पुढे सांगितले की काही एजन्सीज गोव्यातील पर्यटकांना इतर राज्यांतील समुद्रकिनाऱ्यांवरील वॉटरस्पोर्ट्सकडे वळवत आहेत, जो आता ‘गोवा टुरिस्ट प्लेसेस (प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स) (अमेंडमेंट) बिल, २०२५’ नुसार दंडनीय गुन्हा मानला गेला आहे. “वाहतूक विभाग आणि पर्यटन पोलिसांच्या मदतीने आम्ही या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणार आहोत. वॉटरस्पोर्ट्स ऑपरेटरांच्या अधिकृत वेबसाइट्स गोवा टुरिझमच्या वेबसाइटशी जोडल्या जातील, ज्यामुळे पर्यटकांना प्रामाणिक माहिती मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी सांगितले की लवकरच उत्तर आणि दक्षिण गोव्यातील वॉटरस्पोर्ट्स किऑस्कसाठी एकसारखा डिझाईन लागू केला जाईल. “ज्या किनाऱ्यावर पर्यटक जातील, तिथे अधिकृत वॉटरस्पोर्ट्स किऑस्क सहज ओळखता येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

खंवटे पुढे म्हणाले, “सरकार आणि संघटना मिळून बेकायदेशीर दलाली थांबवण्यासाठी काम करत आहेत. संघटनेने सांगितले आहे की त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले जाईल, आणि त्यासाठी पोलिस पडताळणीनंतर माहिती पर्यटन विभागाशी शेअर केली जाईल.”

शेवटी त्यांनी सांगितले की, “कॅप्टन ऑफ पोर्ट्स यांना सूचना दिल्या आहेत की मान्सून काळात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही पर्यटन क्रियाकलापांना परवानगी देऊ नये.”