Connect with us

गोवा खबर

आयटीबी एशिया २०२५’ मध्ये जागतिक पर्यटन क्षेत्रात स्वतःचे स्थान केले बळकट

Published

on

Spread the love
  • ‘गोवा – द गेटवे टू ऑल पॉसिबिलिटीज’ या थीमसह, वर्षभरासाठी योग्य पर्यटनस्थळ म्हणून सादरीकरण

गोवा खबर : गोव्याने आयटीबी एशिया २०२५ मध्ये आपल्या अद्वितीय रेजनरेटिव्ह टुरिझम मॉडेलद्वारे ठसा उमटवला, ज्यात शाश्वतता, संस्कृती आणि जागतिक संपर्क यांचा सुंदर संगम दिसला. ‘गोवा – द गेटवे टू ऑल पॉसिबिलिटीज’ या थीमखाली, पर्यटन खात्याने महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांशी संवाद साधत अर्थपूर्ण सहकार्य आणि जागतिक स्तरावर गोव्याची ओळख अधिक दृढ केली.

गोवा पर्यटन विभागाचं प्रतिनिधित्व करताना कुलदीप आरोलकर (व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीसी), राजेश काळे (उपसंचालक, पर्यटन विभाग), दीपक नार्वेकर (उपमहाव्यवस्थापक – मार्केटिंग/हॉटेल्स व जनसंपर्क अधिकारी, जीटीडीसी), निवृत्ती पार्सेकर (मुख्य अभियंता, जीटीडीसी), अमर हेबळेकर (महाव्यवस्थापक, जीएफडीसी) आणि विशेश नाईक (वरिष्ठ व्यवस्थापक, जीटीडीसी) हे उपस्थित होते.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, आयटीबी एशिया २०२५ मधील आमच्या सहभागामुळे गोव्याला जागतिक पर्यटन क्षेत्राशी नव्या स्तरावर जोडणं शक्य झालं आहे. या संवादामुळे आम्हाला गुणवत्तापूर्ण पर्यटक आकर्षित करता आले, नवे बाजार उघडले आणि गोव्याला वर्षभर भेट देण्यास योग्य ठिकाण म्हणून सादर करता आले. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांमुळे गोव्याची जबाबदार व शाश्वत पर्यटन गंतव्यस्थान म्हणून ओळख अधिक मजबूत होत आहे. या माध्यमातून दीर्घकालीन भागीदारी निर्माण होऊन ‘रेजनरेटिव्ह आणि समावेशक’ पर्यटनाच्या आमच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळेल.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, आयटीबी एशिया मधील सहभाग गोव्याच्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीला बळ देणारा आहे. आम्ही अशा पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर देत आहोत जे गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचा, अध्यात्माचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा जबाबदार पद्धतीने अनुभव घेऊ इच्छितात.

जीटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर म्हणाले, आयटीबी एशिया २०२५ हे व्यासपीठ आम्हाला नव्या पर्यटन कल्पना आणि उपाय शोधण्याची संधी देते. जागतिक भागीदारांबरोबर सहयोग करून गोव्याच्या पर्यटन सेवांना अधिक समृद्ध करताना, आम्ही शाश्वतता आणि स्थानिक समुदायांच्या हितावर विशेष लक्ष केंद्रित करतो.

विरंगुळ्यासाठी आलेले पर्यटक असोत, साहसप्रेमी किंवा योग आणि वेलनेस रिट्रीट्समध्ये सहभागी होणारे, तसेच एमआयसीई आणि फिल्म टुरिझम व्यावसायिक, गोवा प्रत्येकासाठी काहीतरी वेगळा अनुभव देतो. राज्याचा रेजनरेटिव्ह दृष्टिकोन पर्यटनवाढीबरोबर स्थानिक समुदायांचा विकास आणि नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचं जतन सुनिश्चित करतो.

आयटीबी एशिया २०२५ मधील गोव्याच्या यशस्वी उपस्थितीने हे अधोरेखित केलं आहे की गोवा हे एक आधुनिक, नवोन्मेषी आणि जबाबदार पर्यटन गंतव्य आहे, जे शाश्वतता, सहकार्य आणि नव्या संधींच्या माध्यमातून जागतिक पर्यटनात नवी दारे उघडत आहे.