Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या तिसऱ्या दिवशीही समावेशकता, शिक्षण आणि रोजगारसंधीचा जागर

Published

on

Spread the love
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मधील विविध कार्यशाळा आणि अधिवेशनांमध्ये समावेशक शिक्षण, समर्थित रोजगार आणि दिव्यांग व्यक्तींसाठी उदयोन्मुख करिअरसंधींवर प्रकाश
गोवा खबर: आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या तिसऱ्या दिवशी विचारवंत, शिक्षक, सरकारी अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि सहभागी विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येत दिव्यांगजनांची समावेशकता आणि सक्षमीकरण या विषयांवर विचारमंथन केले. सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य कशा प्रकारे संधींचा विस्तार करू शकते, अडथळ्यांना आव्हान देऊ शकते आणि समावेशनाचा मार्ग विस्तारित करू शकते याबाबत दिवसभरातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागर घालण्यात आला.
दिवसाची सुरुवात रेडिओ उडानद्वारे एमएडी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित “बियॉन्ड बॅरियर्स: एक्सपांडिंग होरायझन्स फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज” या करिअर संधी कार्यशाळेने झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन गोवा राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री माननीय श्री. सुभाष फळदेसाई यांनी केले. भौतिक सुलभतेसोबतच सामाजिक मानसिकता बदलण्याचे महत्त्व त्यांनी याप्रसंगी अधोरेखित केले. ते म्हणाले, “आज आपण दिव्यांग व्यक्तींच्या संपूर्ण सहभागात मर्यादा ठरणारे अडथळे दूर करण्याच्या महत्त्वाच्या पैलूवर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे अडथळे केवळ भौतिकच नाहीत, तर ते दृष्टिकोन, सामाजिक नियम आणि धोरणांशी निगडितदेखील आहेत. प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल, असे समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे.”
रेडिओ उडानच्या सह-संस्थापक मीनल सिंघवी यांनी भारतातील पहिले दिव्यंगत्व कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्याबाबतचे त्यांचा प्रवास सादर केला. हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन पूर्णपणे दृष्टिहीन व्यक्तींद्वारे चालवले जाते. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसारख्या कार्यक्रमांचे महत्त्व विषद करताना त्या म्हणाल्या, “दिव्यांग व्यक्तींचा आवाज बुलंद करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी नवीन करिअर संधींची कवाडे उघडणाऱ्या या उपक्रमाचा भाग होणे हे माझ्यासाठी खूपच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे.” या कार्यशाळेत कायदा, विमा आणि इतर क्षेत्रातील करिअरसंधींबाबत मार्गदर्शन करण्याबाबतच्या सत्रांचाही समावेश होता, ज्यामुळे सहभागींना व्यावसायिक विकासासाठी ठोस मार्ग शोधण्यास मदत झाली.
पर्पल पॉवर या शालेय शिक्षणातील समावेशकतेबाबतच्या सत्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षणाकडे वळण्याची सतत गरज आणि असे सहाय्यक शिक्षण वातावरण तयार करण्यात शाळांची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्याशाळेच्या पॅनेलमध्ये ऑकुपेशनल थेरपिस्ट (सेतु) माहेरा कांतावाला; मुष्टीफंड हायस्कूलच्या विशेष शिक्षिका पूर्वा मंडलिक; जीव्हीएम अल्मेडा हायस्कूलच्या विशेष शिक्षिका दीपाली मणेरीकर; आणि फेरीलँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मारिया सायना पेगादो यांचा समावेश होता. या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून पर्वरी येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सिद्धार्थ कुंकळ्येंकर उपस्थित होते. श्री. कंकळ्येंकर म्हणाले, “शाळा समावेशक समुदायांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शाळेतच मुले एकमेकांना समजून घेण्यास, आदर करण्यास आणि पाठिंबा देण्यास शिकतात आणि येथूनच खरा व अपेक्षित बदल सुरू होतो.”
तसेच बेंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सेस (निमहन्स) येथील मानसोपचार सामाजिक कार्याच्या अतिरिक्त प्राध्यापक डॉ. आरती जगन्नाथन यांच्या नेतृत्वाखाली मानसिक विकार असलेल्या व्यक्तींसाठी समर्थित रोजगार या विषयावर एक कार्यशाळा देखील आयोजित केली होती. गोव्यातील विविध संस्थांमधील ३०हून अधिक मानव संसाधन प्रतिनिधींनी या सत्रामध्ये सहभाग घेत, निमहन्सच्या मनोसामाजिक पुनर्वसन आणि रोजगार प्रणालीचा राज्यामध्ये अवलंब करण्याबाबतच्या पर्यायांचा शोध घेतला. “मानसिक आरोग्य स्थिती आणि न्यूरोडायव्हर्सिटी असलेल्या व्यक्तींना सन्मानाने पुन्हा कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अर्थपूर्ण मार्ग तयार करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे डॉ. जगन्नाथन म्हणाल्या. “रोजगार हा पुनर्वसनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि अशा भागीदारीमुळे ते शक्य होते.” गोव्यात समावेशक रोजगार पद्धतींकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकणाऱ्या या सत्रामध्ये गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, युनिकेम लॅबोरेटरीज, अल्कॉन ग्रुप आदी विविध आघाडीच्या उद्योगसंस्था सहभागी झाल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या तिसऱ्या आवृत्तीचा समारोप रविवार (ता. १२) रोजी सायंकाळी ५ वाजता एका भव्य समारोप समारंभाने होईल. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री. पुषपती अशोक गजपती राजू, सन्माननीय अतिथी म्हणून केरळ राज्याचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; केंद्रीय ऊर्जा आणि नवीनीय आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक आणि दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहतील.
दिवसभर, विचारप्रवर्तक सत्रे, चर्चा आणि संवादी कार्यशाळा सुलभता, समानता आणि अर्थपूर्ण सहभागावरील संवाद पुढे नेणार आहेत..
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या सांगताप्रसंगी २१ पर्पल अ‍ॅम्बेसेडरचा सत्कार, पर्पल न्यूजलेटरचे अनावरण, विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण आणि मान्यवरांचे भाषण होणार आहे. तसेच डिसॅबिलिटी अलायन्स, व्हिक्टरी आर्ट्स फाउंडेशन, बासुरी अँड ब्लिस, मिरॅकल ऑन व्हील्स, 7 नोट्स, मानसी घोष आणि पर्पल रेन कॉन्सर्ट यांच्या उत्साही सादरीकरणाने महोत्सवाचा उत्साही समारोप होणार आहे.