गोवा खबर : पणजीस्थित दिशा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत गोव्याच्या विविध भागांतील २७५ हून अधिक दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट – गोवा २०२५ या राज्य सरकारच्या समावेशन आणि सुलभता वाढविणाऱ्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
क्लुब टेनिस दे गॅस्पर डायस, मिरामार, येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ३० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहा गटांमध्ये भाग घेत आपली कलात्मक प्रतिभा आणि सर्जनशीलता सादर केली.
या वार्षिक स्पर्धेचं हे २४वं वर्ष असून, दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना दिशा चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव संध्या काळोखे म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत आम्ही पाहिलं आहे की या मुलांमध्येही अपार कलात्मकता, क्षमता आणि स्वप्नं आहेत. आमचं उद्दिष्ट म्हणजे त्यांच्या या प्रतिभेला मंच देणं आणि समाजात सहवेदना निर्माण करणं, दया नव्हे.
स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांनी रंगीत नृत्यसादरीकरणही केलं आणि विविध गाण्यांवर नाचून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरणाने झाला. यावेळी प्रायॉरिटी कन्स्ट्रक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक परिंद नाचनोळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या सहा गटांतील विजेते पुढीलप्रमाणे:
-
के.आर. आदिदेव – स्टुडंट्स फेडरेशन फॉर द राइट्स ऑफ द डिफरंटली-एबल्ड (SFAL), पणजी
-
दिक्षित गावडे – केशव सेवा साधना स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, वाळपई
-
जुबल पिशोतो – चेतना स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, कुडचडे
-
सीमा कळंगुटकर – स्टुडंट्स फेडरेशन फॉर द राइट्स ऑफ द डिफरंटली-एबल्ड, पणजी
-
रामनाथ भंडारी – पीस हेवन कॉन्व्हेंट स्कूल, करंझाळी
-
शिवानी चारी – लोकविश्वास प्रतिष्ठान स्पेशल स्कूल, मुळे