Connect with us

गोवा खबर

‘माझे घर’ योजना लोकांची मते मिळवण्यासाठीच : काँग्रेसचा आरोप

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘माझे घर योजना’ ही जनतेला ब्लॅकमेल करण्यासाठीच तयार करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.

पक्षाचे आमदार व माजी ऍडव्होकेट जनरल कार्लोस फेरेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या योजनेद्वारे सरकारला बेकायदेशीर बांधकामांची माहिती मिळेल आणि नंतर लोकांना मतांसाठी दबावाखाली आणले जाईल.

फेरेरा म्हणाले, “या योजनेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे, मात्र ही निवडणूकपूर्व ‘जुमला योजना’ असून भाजप केवळ मतांसाठी हा डाव खेळत आहे. मते न दिल्यास घर कायदेशीर करणार नाही, अशी धमकी लोकांना दिली जाण्याची शक्यता आहे.”

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी गोव्यात वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधत, “राज्यात गुंडाराज सुरू आहे. दिवसाढवळ्या खून, चोऱ्या आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत,” असा आरोप केला.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, “सेल्फ हेल्प ग्रुपना शाह यांच्या सभेत चकित करणारी भेट दिली जाणार असल्याचे भाजपने सांगितले आहे. मात्र, मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील असे जाहीर केले होते, त्याचे काय झाले याचे उत्तर आधी द्यावे. महिलांनी हे पैसे मागावेत,” असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.