गोवा खबर : सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आज विद्यार्थी समुदायाला डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन देशाच्या भल्यासाठी निस्वार्थपणे काम करण्याचे आवाहन केले. ते आज सासस्टी येथील नावेली येथे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलत होते.
कामत यांनी डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स हे एक महान विचारवंत होते ज्यांनी पोर्तुगीज संसदेत स्वातंत्र्यासाठी आवाज उठवून राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. ते एक खरे देशभक्त होते ज्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आपल्या पदाचा वापर केला असे सांगितले.
शिक्षण हे व्यक्तीच्या उन्नतीसाठी सर्वोत्तम साधन आहे. जीवनात शिक्षणाचा यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी नावेली गावाच्या वचनबद्धतेचे मंत्र्यांनी कौतुक केले. समाजात नैतिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी, घरातून आणि प्राथमिक शिक्षणातून ते रुजवायला हवे यावर कामत यांनी भर दिला. दैनंदिन जीवनात डॉ. गोम्स यांच्या तत्त्वांचे पालन करणे ही त्यांच्या वारशाला खरी आदरांजली ठरेल असे कामत म्हणाले.

डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष लुईझिन्हो फालेरो यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरू होण्याच्या ३० वर्षांपूर्वी डॉ. गोम्स यांनी पोर्तुगीज संसदेत भारतासाठी राष्ट्रवादाचा मुद्दा मांडला होता. त्यांनी ट्रस्टने नावेली येथे डॉ. गोम्स यांच्या नावाने स्थापन केलेले ग्रंथालय देशातील सर्वोत्तम ग्रंथालयांपैकी एक असल्याची माहिती दिली. त्यांनी तरुण पिढीला ग्रंथालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि इतर खात्यांच्या प्रयत्नांचे फालेरो यांनी कौतुक केले.
फादर गाब्रिएल कुतिन्हो यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी डॉ. गोम्स यांच्या महान विचारसरणीचे पालन करण्याची गरज व्यक्त केली.
नवेलीचे आमदार उल्हास तुयेंकर, माजी आमदार आवेर्तान फुर्तादो, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, आयएएस, दक्षिण गोवा एसपी टिकमसिंग वर्मा, आयपीएस, जि. पंचायत सदस्य एडविन कार्दोज, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, नवेलीचे सरपंच पॉल परेरा यावेळी उपस्थित होते.
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी, सरकारने २०२४ पासून त्यांच्या जन्म आणि पुण्यतिथींना राज्यस्तरीय कार्यक्रम म्हणून घोषित केले आहे. याप्रसंगी नावेली गावातील शाळांमधील मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली. अविटो पिरेस डी मिनेझीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.