गोवा खबर : राज्यातील खाण व्यवसाय २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. खाण क्षेत्राशी संबंधित एकही ट्रकधारक किंवा कामगार रोजगाराविना राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डिचोली येथे भाजपतर्फे आयोजित तालुक्यातील महनीय व्यक्तींच्या विशेष मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी खासदार सदानंद तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कार्बोटकर, गोविंद पर्वतकर, सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षांत भारताने जागतिक स्तरावर भरीव प्रगती साधली असून, देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘एक देश एक कर’ या संकल्पनेतून जीएसटीच्या नव्या बदलामुळे देशवासीयांना मोठा क्रांतिकारक बदल अनुभवायला मिळणार आहे. आगामी काळात भारत अर्थव्यवस्थेत जगातील तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी पुढे सांगितले की, आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण गोवा घडवण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. घरे कायम करण्याच्या योजनेअंतर्गत केलेले क्रांतिकारक कायदे आणि लोकांना दिलेला दिलासा ही सरकारची मोठी उपलब्धी आहे. तसेच नवे शैक्षणिक धोरण स्वीकारून गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले असून शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीतही मोठी झेप घेतल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कायद्याविषयी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी इशारा दिला की, कोणत्याही हेतूने गुंडगिरी करून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही. “अशा व्यक्तींना आम्ही थेट तुरुंगात डांबू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये डॉ. दिनेश आमोणकर, मनोज सावईकर, नारायण नार्वेकर, अंशिका नाईक, विनायक उमर्ये, दामिनी आरोंदेकर, डॉ. अपर्णा वाडकर, डॉ. प्रणय बुडकुले, दयानंद नाईक, दामोदर मळीक, संध्या खानोलकर, अभय तेंडुलकर, नीळकंठ खलप, व्यंकटेश नाटेकर, प्रभाकर वेर्णेकर आणि अर्जुन नाईक यांचा समावेश होता.
समारोपाला, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व मान्यवर व नागरिकांना विकसित गोवा घडवण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले.