गोवा खबर : गोव्यातील सर्व इस्पितळे, प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्रे ‘आदर्श’ बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, या कामासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक नागरिकाला वेळेवर, दर्जेदार आणि उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तिस्क-उसगाव येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या योजनेअंतर्गत पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सावर्डेचे आमदार गणेश गावकर, आरोग्य संचालिका डॉ. रूपा नाईक, जीएमसीचे डीन आर. जयप्रकाश तिवारी, आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ. संदेश मडकईकर, उसगाव पंचायत सदस्य उमाकांत गावडे, विविध पंचायतींचे सरपंच व मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचा ५५० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. रुग्णांना औषधांचेही वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. संदेश मडकईकर यांना उपसंचालकपदी बढती मिळाल्याबद्दल आमदार गणेश गावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री राणे यांनी सांगितले की, पिळये प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधा व साधनांनी सुसज्ज केले जाईल. येथे शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. तसेच उत्कृष्ट जनसेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसहाय्य गटांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.
कुळे येथे सर्व सुविधा असलेले आधुनिक इस्पितळ उभारण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील लोकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. महिला सशक्तीकरण व युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा विशेष भर असेल, असे राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, फक्त भाषणबाजी न करता प्रामाणिकपणे कृतीतून लोकांची सेवा करणे हेच खरे कर्तव्य आहे.