-
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते महिला सशक्तीकरणाचा उपक्रम
गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कला अकादमी संकुलात पार पडले. या कार्यक्रमात महिला सेल्फ हेल्प ग्रुपना तब्बल ६२ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. याशिवाय २४ हून अधिक वाहने महिला गटांना प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विकास खाते आणि गोवा लाइव्हलिहूड मिशन यांनी संयुक्तपणे केले होते. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, राज्यसभा खासदार सदानंदशेट तानावडे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, अपक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘लखपती दीदी’, ‘बँक सखी’ व विविध एनजीओंना सन्मानित करण्यात आले. तसेच सीआरपी-ईपी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली.
मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रसंगी महिलांना ‘स्वस्थ नारी, स्वस्थ परिवार’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्रामीण आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे महिलांना मोफत औषधे आणि आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन दिले आहे. “गर्व से कहो हम स्वदेशी बेचते हैं” या घोषवाक्याखाली स्वदेशी वस्तूंचा प्रचार सर्वांनी करावा. हे आवाहन आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेस पूरक आहे.
दरम्यान, बहुतांश मंत्री या कार्यक्रमात उपस्थित असताना कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांचा गैरहजेरी विशेष जाणवली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, तवडकर आपल्या काणकोण मतदारसंघातील सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.