गोवा खबर : गोवा क्रीडा प्राधिकरण (साग) व क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय या दोन्हींचे संचालक पद माझ्याकडे आल्यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रभावी काम करता येईल. माझा मनोदय आहे की, राज्याचे क्रीडा धोरण पुनरुज्जीवन करून डिसेंबर २०२५ पर्यंत नवे धोरण तयार करावे, असे सागचे नवे कार्यकारी संचालक डॉ. अजय गावडे यांनी सांगितले.
सोमवारी डॉ. गावडे यांनी कार्यकारी संचालक पदाचा ताबा घेतला. यावेळी सागच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
सध्या गोवा राज्य २००९ च्या क्रीडा धोरणानुसार कार्यरत आहे. जवळपास १६ वर्षे झाली असल्याने या धोरणामध्ये बदल आवश्यक असल्याचे डॉ. गावडे यांनी नमूद केले. नवीन धोरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणार आहे.
खेळाडू आणि संघटनांसाठी दर्जेदार सुविधा
डॉ. गावडे म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी अनेक दर्जेदार सुविधा राज्यात उभारल्या गेल्या आहेत. आता या सुविधांचा योग्य वापर खेळाडू आणि क्रीडा संघटनांना कसा करून देता येईल यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात खेलो इंडिया सेंटर उभारण्याचाही विचार आहे.
त्यांनी स्पष्ट केले की चांगले प्रशिक्षक नेमणे, अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या प्रशिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत घेणे, प्रशिक्षकांच्या समस्या सोडवणे यावरही प्रयत्न केले जातील. या प्रक्रियेला काही काळ लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
नवीन धोरण आखताना तज्ज्ञांचे मत घेतले जाईल आणि आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. येणाऱ्या महिन्याभरात हे बदल दिसायला सुरुवात होईल, असे गावडे म्हणाले.