गोवा खबर : सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल (एसएएफ) आपले दहावे पर्व 12 ते 21 डिसेंबर दरम्यान पणजी, गोवा येथे साजरे करणार आहे. गेल्या दशकभरात कलेचा उत्सव, समावेशकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणणाऱ्या या महोत्सवात यंदा 35 हून अधिक क्युरेटर्स सहभागी होत आहेत. यात शुभा मुद्गल, लिलेट दुबे, एहसान नूरानी, मनु चंद्रा, गीता चंद्रन यांसारख्या नामवंतांचा समावेश आहे.
या पर्वाच्या निमित्ताने भारतातील विविध शहरांमध्ये वर्षभर कार्यक्रम होतील. संस्थापक सुनील कांत मुंजाल म्हणाले, गेल्या दहा वर्षांत सेरेन्डिपिटी हे कल्पनांचे शहर बनले असून इथे कला आणि समाज एकत्र प्रगती करत आहेत.” पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांनी या महोत्सवाने स्थानिक कलाकार, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला दिलेल्या चालनेची प्रशंसा केली.

दृश्यकलेसाठी रणजीत होस्कोटे, ठुकराल-टाग्रा, सुदर्शन शेट्टी, वीरांगनाकुमारी सोलंकी यांसारखे क्युरेटर्स निवडले गेले आहेत. हस्तकलेसाठी क्रिस्टीन मायकल, रश्मी वर्मा आणि अंजना सोमनी यांची निवड झाली आहे. फोटोग्राफी विभागात रवी अगरवाल, रहाब अल्लाना, प्रशांत पंजियार आणि दिनेश खन्ना काम पाहणार आहेत. नृत्यात गीता चंद्रन, जयचंद्रन पलाझी, रंजना दवे आणि तनुश्री शंकर तर रंगभूमीमध्ये महेश दत्तानी, अनुराधा कपूर, लिलेट दुबे यांचा समावेश आहे. संगीत विभागात एहसान नूरानी, झुबिन बालापोरिया, शुभा मुद्गल, रंजीत बारोट सहभागी होणार आहेत. पाककलेसाठी मनु चंद्रा, ओडेट मॅस्करेनहस, राहुल अकेरकर यांची निवड झाली आहे.
सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2025 मध्ये नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अनुदाने जाहीर केली आहेत, ज्यात सेरेन्डिपिटी आर्ट्स रेसिडन्सी, फोक आर्ट्स ग्रांट, आर्ट्स जर्नलिझम ग्रांट यांचा समावेश आहे.
पणजीतील हा सोहळा होणार असून, कलेद्वारे सामाजिक बदल घडविण्याचा सेरेन्डिपिटीचा उद्देश यंदाही ठळकपणे दिसून येणार आहे.