गोवा खबर : भाजप सनातन धर्माबद्दल बोलतो; पण त्याचे पालन करण्यात मात्र अपयशी ठरतो. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या आई हीराबा मोदी यांच्या निधनानंतर मुंडन केले नाही, ह्यावरुन स्पष्ट होते की त्यांना सनातन धर्माची पर्वा व आदर नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंदिरात केक कापणे हा देखील सनातन धर्माचा अपमान आहे, असे काँग्रेसचे मीडिया चेअरमन अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
“गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे इतर नेत्यांच्या समक्ष मंदिरात हा प्रकार घडला. हा सनातन धर्माचा उघड अपमान आहे. मंदिरे ही प्रार्थना आणि भक्तीची पवित्र स्थळे आहेत; वाढदिवस किंवा राजकीय दिखावा करण्याची ठिकाणे नाहीत. यावरूनच स्पष्ट होते की भाजप धार्मिक स्थळांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करतो. अशा नीच पातळीच्या राजकारणावर लाज वाटली पाहिजे,” असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

भाजप स्वतःला हिंदुत्वाचा रक्षक म्हणून खोटा दिखावा करतो; पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या दांभिकपणाचे पुन्हा दर्शन घडते, असेही त्यांनी सांगितले.
“पवित्र स्थळाचा वापर स्वतःच्या स्वस्त उत्सवासाठी करून भाजपने हिंदू धर्माच्या पवित्रतेचा अपमान केला आहे आणि कोट्यवधी भक्तांचा विश्वास दुखावला आहे. हे भक्ती नव्हे तर हा अधर्म व अशुद्ध कृत्य आहे आणि तो कधीही माफ केला जाणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.
“भाजप आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी निष्कपटीने सार्वजनिक माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. गोव्याची जनता आणि देशभरातील हिंदू धर्मीय आपल्या धर्मावर होणारे असे वारंवार हल्ले कधीच सहन करणार नाहीत,” असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.