गोवा खबर : पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ३२ वा गणेशोत्सव यंदा विशेष उपक्रमांसह साजरा होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष रुपेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या पाच दिवसांत धार्मिक विधी, पूजा व आरत्या होणार आहेत. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.
महत्वाचे म्हणजे यंदा मुस्लिम समाजाच्या वतीने आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे समाजातील ऐक्याला अधिक बळ मिळेल, असे आयोजकांनी सांगितले.
उत्सवाच्या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सत्यनारायण पूजा, अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा, इस्कॉनचे भजन-व्याख्यान, डान्स अकादमीचे नृत्यप्रयोग, चित्रकला व बाल भजनी स्पर्धा यांचा समावेश आहे.
झी मराठी ‘सारेगमप’ फेम गायक चैतन्य कुलकर्णी हा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा, दिंडी व लेझीमची दिमाखदार उपस्थिती असेल.