Connect with us

गोवा खबर

अॅप टॅक्सीला ठाम विरोध : आरजीचा इशारा

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:गोव्यात अॅप आधारित टॅक्सी सेवा आणण्याच्या हालचालींना आरजी पक्षाने जोरदार विरोध दर्शवला आहे. “गोंयकारपण वाचवायचे असेल तर स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा गोव्यात येऊ देणार नाही,” असा ठाम इशारा पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी दिला.
वाहतूक खात्याच्या कार्यालयाबाहेर टॅक्सीचालकांनी केलेल्या निदर्शनाला परब व आमदार विरेश बोरकर यांनी थेट हजेरी लावून पाठिंबा दिला. परब म्हणाले, “सरकार अॅप अॅग्रीगेटर योजना राबवून स्थानिक व्यवसाय धोक्यात आणत आहे. याचा फायदा केवळ काही मोजक्या राजकारण्यांना व अॅप कंपन्यांना होणार आहे. गोव्यातील पारंपरिक टॅक्सी उद्योग उभा राहण्यासाठी टॅक्सीवाल्यांनी एकजुटीने लढा द्यायला हवा.”
आमदार विरेश बोरकर यांनीही सरकारवर टीका करताना सांगितले, “आम्ही विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता, पण अजून निर्णय नाही. सरकारला स्थानिक चालकांची चिंता नाही, त्यांचे लक्ष बाहेरून आलेल्या माफियांच्या फायद्यावर आहे.”
परब म्हणाले, “मोठ्या शहरांत लोकसंख्या प्रचंड असल्याने अॅप टॅक्सी चालतात. पण गोव्यात लोकसंख्या केवळ १४ लाख आहे. इथे या सेवेमुळे स्थानिक टॅक्सी उद्योग कोलमडेल. आरजी पक्ष हे होऊ देणार नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.