गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन मंत्री रोहन खवंटे आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या उपस्थितीत पणजी येथील कदंब बस स्थानकावर माहिती आणि प्रसिध्दी खात्याने आयोजित केलेल्या फाळणी भयावह दिना’निमित्त तीन दिवसांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना आपल्याला स्वातंत्र्य फुकट मिळाले नाही. भारताच्या फाळणीमुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्यात सुधारणा करून अनेक भारतीयांना नागरिकत्व देऊन दिलासा दिला. या दुरुस्तीमुळे त्यांना न्याय मिळाला असे ते म्हणाले.
सुरवातीस माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि फाळणीचा लोकांवर झालेल्या परिणामाची माहिती देण्यासाठी तीन दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे असे सांगितले.
माहिती अधिकारी किरण मुनणकर, सहाय्यक माहिती अधिकारी शांतो नाईक आणि गोविंद गावकर हे यावेळी उपस्थित होते. श्याम गावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याने आयोजित केलेले ‘फाळणी भयावह स्मृतिदिन’ प्रदर्शन काणकोण आणि पेडणे येथील कदंब बस स्टँडवरही आयोजित करण्यात आले आहे.