गोवा खबर : भर पावसातही वाळपईत मंगळवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थी हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभक्तीचा उत्साह पावसाच्या सरींमध्येही ओसंडून वाहत होता.
यात्रेची सुरुवात वाळपई भाजप कार्यालयातून झाली. मार्गक्रमण करताना विविध पंचायतींचे सरपंच, पंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी तिरंगा हाती घेतला. शहीद स्तंभाजवळ पोहोचताच शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असलेले नरेंद्र मोदी हे कणखर व्यक्तिमत्त्व आपल्या पंतप्रधानपदी लाभले आहे. त्यांच्या हातांना बळकट करण्यासाठी युवकांनी व महिलांनी तिरंग्याचा सन्मान करावा, आणि प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटती ठेवावी. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून त्याचा सन्मान करावा.”
त्यांनी पुढे सांगितले की, देशाप्रती असलेले उत्तरदायित्व प्रत्येकाने जपले पाहिजे आणि युवा पिढीने राष्ट्रभक्तीची भावना पुढील पिढीकडे पोहोचवली पाहिजे. मुसळधार पाऊस असूनही शेकडो लोकांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.