गोवा खबर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो (सीबीसी), गोवा यांनी न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा शाखा आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या सहकार्याने 12 ऑगस्ट रोजी विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स, एज्युकेशन, कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट, विद्या नगर, अल्टो पर्वरी येथे जागतिक स्तनपान सप्ताह 2025 निमित्त एक कार्यक्रम आयोजित केला.
महाविद्यालयातील महिला कक्ष आणि वैद्यकीय कक्ष यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्तनपानाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच माता आणि अर्भकांसाठी शाश्वत आधार व्यवस्था स्थापित करण्यची गरज अधोरेखित करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. उज्ज्वला हणजुणकर यांच्या स्वागतपर भाषणाने सत्राची सुरुवात झाली. उपस्थितांना संबोधित करताना सीबीसी गोव्याचे प्रचार अधिकारी रियास बाबू म्हणाले, स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार व्यवस्था तयार करा” ही या वर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना माता आणि बालकांना यशस्वी स्तनपानासाठी आवश्यक असलेली मदत मिळावी यासाठी आपण घेत असलेल्या सामूहिक जबाबदारीची आठवण करून देते. येणाऱ्या पिढीसाठी शाश्वत आधारप्रणाली तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. पोषण, आरोग्य आणि भावी पिढ्यांसाठी ही सामाजिक बांधिलकी आहे. भारत सरकारची संवाद शाखा म्हणून सीबीसी अशा महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य संदेशांचा प्रचार करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.

गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सचे प्राचार्य डॉ. महेश पै यांनीही मेळाव्याला संबोधित केले व माता आणि बाल आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा शाखेच्या संयोजक आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सहाय्यक प्राध्यापक वर्षा नाईक यांनी या वर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या संकल्पनेवर आधारित माहितीपूर्ण पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे सत्राचे नेतृत्व केले. त्यांनी समुदाय, आरोग्यसेवा आणि धोरणात्मक चौकटींद्वारे स्तनपान देणाऱ्या मातांना पाठबळ देण्याची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली.

या कार्यक्रमात 80 हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग होता. त्यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी पोषण आणि बालसंगोपनाचे विविध पैलू स्पष्ट करणारी प्रश्नोत्तरे झाली.