गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील झर्मे व दाबे या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी झर्मे गावात जलकुंभ बांधण्याची मागणी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. बांधकाम खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्या बोलत होत्या.
गेल्या तीन वर्षांतील प्रयत्नांमुळे मतदारसंघातील सुमारे ५० टक्के पाणीटंचाई दूर करण्यात यश आले आहे, असे डॉ. राणे यांनी सांगितले. मात्र, अजूनही काही भाग पाणीटंचाईने त्रस्त आहेत, त्यामुळे झर्मे परिसरात जलकुंभ उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शाळांच्या दुरुस्तीविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली. अनेक शाळांचे दुरुस्तीचे काम अद्याप प्रलंबित असून काही ठिकाणी कामे सुरू आहेत. उर्वरित शाळांची कामे त्वरित पूर्ण करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. अंगणवाड्यांचीही अवस्था अत्यंत खराब असून त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रस्त्यांची दुरवस्था, अभियंत्यांची कमतरता
सत्तरी तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असून काही रस्त्यांवर भूमिगत केबलिंगच्या कामांमुळे खड्डे पडले आहेत आणि त्यांची अद्याप दुरुस्ती झालेली नाही, याकडे आमदार राणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेषतः रस्ते विभागात अभियंत्यांची कमतरता असून त्यामुळे कामांमध्ये विलंब होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत बोलण्यास पुरेसा वेळ द्या
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वर्षातून फक्त एकदाच होते. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न सरकारपुढे मांडण्याची संधी मिळायला हवी, असे मत आमदार राणे यांनी मांडले. सभागृहात जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आमदारांना पुरेसा वेळ मिळावा, अशी त्यांनी उपसभापतींकडे मागणी केली.
“पर्ये मतदारसंघात एकूण १२ पंचायती आहेत. त्यातील निम्म्या समस्या सरकारने सोडवल्या आहेत. मात्र, उर्वरित प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी वेळ मिळणे गरजेचे आहे,” असे सांगत त्यांनी अधिवेशनात अधिक वेळ देण्याची मागणी अधोरेखित केली.