गोवा खबर : गोवा एआय मिशन २०२७ अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची रूपरेषा मांडताना माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री रोहन खंवटे यांनी दक्षिण आशियामध्ये एआय-नेतृत्वाखालील नवोपक्रमात, राज्याला आघाडीवर ठेवण्यासाठी तयार केलेला नकाशा सादर केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील हे अभियान चार पायाभूत स्तंभांवर आधारित आहे: कौशल्य, स्टार्टअप्स आणि कंपन्या, भांडवल आणि सरकारी धोरण व पायाभूत सुविधा. हे स्तंभ नागरिक, शैक्षणिक आणि उद्योगांना लाभदायक असलेल्या समावेशक, नवोपक्रम-चालित अशा एआय परिसंस्थेचे पोषण करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.
या उपक्रमाच्या केंद्रस्थानी प्रस्तावित गोवा एआय मिशन काउन्सील आहे, जी नवीन एआय धोरणाचा मसुदा तयार करण्याचे नेतृत्व करेल आणि एआयमध्ये प्रभावी अवलंब व नेतृत्व करण्यासाठी, राज्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे मार्गदर्शन करेल. या मिशनला गती आणि पंख देण्यासाठी सेक्शन ८ कंपनीची स्थापना प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मिशनला कायदेशीर दर्जा मिळेल, असे खंवटे म्हणाले.
मंत्री म्हणाले, आम्ही राज्यात उत्कृष्टता केंद्रे (सीओई) आणि एआय प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याच्या अंमलबजावणीवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आणि सहकार्य वाढविण्यासाठी एआय मिशन काउन्सील अंतर्गत एक सल्लागार समिती देखील स्थापन केली जाईल.
एआय-चालित चॅटबॉटचे कार्यान्वयन ही प्रशासनात, कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले.