गोवा खबर : २३ जुलै रोजी गोवा विधानसभेत दिलेल्या उत्तरातून रवींद्र भवन, मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सार्वजनिक निधीचा कसा गैरवापर केला आहे, हे उघड झाले आहे. संपूर्ण गोव्यातील सर्व रवींद्र भवन आणि कला मंदिरांपैकी फक्त मडगावमध्येच अध्यक्षांनी दोन महिला वैयक्तिक सहायिका, एक पुरुष चालक आणि एक मल्टी-टास्किंग कर्मचारी असे वैयक्तिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे सर्व कर्मचारी अध्यक्षाच्या वैयक्तिक सेवेसाठी नियुक्त असून त्यांचा एकूण वार्षिक पगार १६.८४ लाख आहे, अशी माहिती मडगावचो आवाज आणि युवक नेते प्रभव नायक यांनी उघड केली आहे.
या नियुक्त्यांचे स्वरूपही अत्यंत धक्कादायक आहे. या चारही कर्मचाऱ्यांना महिना ३५,८४० (सहायिका व चालक) आणि ३२,८९५ (मल्टी-टास्किंग) इतका पगार मिळतो, पण त्यांच्या कामाचे कोणतेही स्पष्ट स्वरूप नाही. विधानसभेच्या उत्तरात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हे सर्व कर्मचारी “अध्यक्षांच्या सूचनेनुसार” काम करतात. हे प्रशासन नाही, ही हुकूमशाही आहे, असा घणाघात प्रभव नायक यांनी केला.
रवींद्र भवन ही सांस्कृतिक केंद्रे सामान्य लोकांसाठी उभारण्यात आली होती, राजकीय नियुक्त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे. गोव्यातील कोणत्याही इतर केंद्रात अध्यक्षांना वैयक्तिक कर्मचारी लागत नाहीत. मग मडगावचे रवींद्र भवन अपवाद का? अध्यक्षपद हे कलाकारांना सेवा देण्यासाठी आहे की एखादे राजेपद आहे?, असा संतप्त सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला आहे.

ही परिस्थिती गोमंतकीय कलाकारांवर प्रहार आहे. आर्थिक अडचणीचा सामना करीत असलेले कलाकार “पाय तियात्रीस्त सभागृह’ बंद असल्याने संकटात सापडले आहेत. पण सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. दुसरीकडे १७ लाख वार्षिक खर्च केवळ एका व्यक्तीच्या ऐषआरामासाठी केला जातो आहे. सदर प्रकार म्हणजे अतिशय गंभीर आर्थिक बेजबाबदारी आहे,” असा आरोप नायक यांनी केला.
एक मडगावचा एक तरुण नागरिक आणि कलाकार म्हणून मी सरकारकडे मागणी करतो की हा अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे की या नेमणुका मंत्रिमंडळाच्या मान्यतेने झाल्या आहेत की केवळ राजकीय वरदहस्तामूळे मंजूर झाल्या आहेत? सार्वजनिक संस्थांना वैयक्तिक सुखासाठी वापरण्याची परवानगी देता कामा नये, असा इशारा प्रभव नायक यांनी दिला आहे.
जर अशा प्रकारचा पायंडा थांबवला नाही, तर शासनावरचा जनतेचा विश्वास ढासळत जाईल. मी सर्व कलाकार आणि सामाजिक संघटनांना आवाहन करतो की त्यांनी एकत्र येऊन या निधीच्या दुरुपयोगाविरोधात आवाज उठवावा. रवींद्र भवन हे कलाकारांचे आहे, एखाद्या अध्यक्षाची वैयक्तिक मालमत्ता नाही, असे प्रभव नायक यांनी ठणकावून सांगितले.