गोवा खबर : राज्यातील पर्यटनाशी संबंधित सेवांचे नियमन करण्यासाठी आणि पर्यटकांना सुरक्षित, अखंड अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने मोपा विमानतळ पोलिस स्टेशनच्या समन्वयाने, गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा, १९८२च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू केली आहे.
आशिष पीटर फर्नांडिस (३५ वर्षे); आणि फिरोज अहमद शेख (३९ वर्षे) हे दोघेही कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहेत. गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा, १९८२च्या कलम २६ सह कलम २(जी) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर व्यक्तींच्या अनधिकृत कृती या पर्यटकांच्या सुरळीत हालचालींना हानिकारक असल्याचे आणि राज्यात येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचे ठरत असल्याचे आढळून आले आहे. गोव्यात अनधिकृत कारवायांवर आळा घालण्यासाठी आणि जबाबदार, पारदर्शक व कायद्याचे पालन करणाऱ्या पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन खाते आपली वचनबद्धता अधोरेखित करते. पर्यटकांना फक्त नोंदणीकृत ऑपरेटरकडूनच सेवा घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच कोणत्याही संशयास्पद किंवा अनधिकृत हालचालीची तक्रार जवळच्या पर्यटन किंवा पोलिस अधिकाऱ्यांना करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.