गोवा खबर : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या आमदारांनी ग्रीन सेसच्या वसुलीबद्दलचा सादर केलेला तारांकित प्रश्न अतारांकित का केला असा प्रश्न केला व भाजप सरकार 4,000 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यावर चर्चा करण्यास टाळत आहे असा आरोप केला.
सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार आणि गैरप्रथांचे उघड करणारे तारांकित प्रश्न अतारांकित करणे हा त्यांना झालेल्या भीतीचा स्पष्ट संकेत आहे. ही कृती म्हणजे लोकशाहीवर एक हल्ला आहे, असे आलेमाव म्हणाले.
काँग्रेसचे नेते आलेमाव यांनी सांगितले की मागील अधिवेशनात ग्रीन सेस वसुलीवरच्या प्रश्नाला नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी उत्तर दिले होते, तथापि यावेळी हा प्रश्न चर्चेस न यावा यासाठी वित्त खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे.
अपयश, घोटाळे आणि भ्रष्टाचारापासून स्वताला वाचवण्यासाठी भाजप सरकार अशा असंविधानीक उपाययोजना करत आहे. सरकारने सभागृहाला आश्वासन दिले होते की थकीत देयकाची वसूली केली जाईल. वसुलीवर अद्यावत माहिती मिळविण्यासाठी आणि याचा सरकारी महसूलावर प्रभाव याबद्दल, माझे सहकारी आमदार कार्लोस फेरेरा, ॲल्टन डिकॉस्टा आणि मी स्वता ‘ग्रीन सेस’ शीर्षकाने आणखी एक तारांकित प्रश्न नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याला सादर केला होता. तथापि, सरकारने हा तारांकित प्रश्न वित्त खात्यात पाठवून तो अतारांकित केला आहे, असे आलेमाव म्हणाले.
ही कृती केवळ विरोधकांवर अन्याय करत नाही तर विधानसभेच्या मूल्ये आणि लोकशाहीस देखील धक्का पोहोचवते. विरोधकांचा आवाज दाबण्याचा आणि आर्थिक घोटाळ्यां पासून संरक्षण मिळवण्याच्या भाजपाच्या या प्रयत्नांना आम्ही खोडून काडू, असे आलेमाव म्हणाले.