गोवा खबर : पूर्णतः अंध असलेले रोटेरियन ताहा हाजिक यांची रोटरी वर्ष २०२५-२६साठी रोटरी क्लब ऑफ बार्देझ कोस्टल (डिस्ट्रीक्ट ३१७०)च्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करत रविवार १३ जुलैची संध्याकाळ एका ऐतिहासिक निर्णयाने साजरी केली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी गोवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मान्यवर, रोटरी क्लबचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठी गर्दी पणजीतील काकुलो मॉलमधील टर्मिनल हॉलमध्ये जमली होती.
या निवडप्रसंगी विचार मांडताना सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, शारिरीक क्षमतेपेक्षा नेतृत्वगुण महत्वाचा असतात हा महत्वाचा विचार ताहा हाजिक यांची अध्यक्षपदी नियुक्तीद्वारे देण्यात आला आहे. याद्वारे सर्वसमावेशक नेतृत्व घडवा, सादर करा, असा मोलाचा संदेश या नियुक्तीतून भारतातील सर्व संस्था, संघटनांना देण्यात आला आहे.
हाजिक यांच्यामुळे, १४७ क्लब असलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये प्रथमच अशा प्रकारची नियुक्ती ठरली आहे. समावेशकतेच्या ताकदीबरोबरच, २०२४-२०२६ कार्यकाळासाठी गतिमान नेतृत्व दिलेले जिल्हा गव्हर्नर रोटेरियन अरुण भंडारे यांनी सादर केलेला नेतृत्वक्षमतेचा वारसासुद्धा ही नियुक्ती अधोरेखित करते.

या निवडप्रक्रियेस संबोधित करताना नवनियुक्त अध्यक्ष ताहा हाजिक म्हणाले जेव्हा मी या भूमिकेत पाऊल ठेवत आहे, तेव्हा याबरोबर माझी क्षमता तर सोबत असेलच, त्याचबरोबर सर्वसमावेशकतेचा विचार हा सर्वांत मोठे बलस्थान असल्याचा दृढ विश्वासही सोबत आहे. या क्लबचा अध्यक्ष म्हणून काम करणारा प्रथम १००% अंध व्यक्ती ठरलो आहे. अडथळे दूर करून संधीची कवाडे खुली केली तर काहीही शक्य होते, हा विश्वास या निवडीतून ठळकपणे सादर होत आहे.
हाजिक म्हणाले, आम्ही फक्त संधीची कवाडे खुली करत नाही, तर प्रत्येकाचा समावेश होईल यारितीने या संधींना प्रशस्त करत आहोत.
रोटरी इंटरनॅशनलच्या ‘युनाइट फॉर गुड’ आणि जिल्हा ३१७० च्या ‘क्रिएटिंग लिगसी’ या संकल्पनेशी सुसंगत अशा या नियुक्तीमुळे समावेशक नेतृत्वाचा नवा अध्याय रचला जाणार आहे.
ताहा हाझिक सध्या गोवा राज्यांच्या दिव्यांगजन आयुक्त कार्यालयात सचिव म्हणून काम करतात. राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धोरण निश्चिती, प्रवेश सुलभता, समावेशकता, दिव्यांगजनांचे अधिकार यांचा पुरस्कार करणे, प्रसार करणे याबाबत महत्वाची भूमिका बजावत आहेत.
यावेळी क्लबचे सचिव म्हणून रोटेरियन भुवन पौडेल यांची, तर कोषाध्यक्ष म्हणून रोटेरियन रमेश सिंह यांच्यासह २०२५-२६ साठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या निवडप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले रोटेरियन गौरीश धोंड म्हणाले, सेवा आणि नवनव्या सीमा पार करणे हा रोटरीच्या विचारधारेचा कणा आहे. ताहा यांच्या नेतृत्वाखाली, बार्देश कोस्टल क्लबद्वारे रूढीवादी कल्पनांना आव्हान दिले जाईल आणि खऱ्या समावेशकतेच्या विचाराचे समर्थन केले जाईल.
याप्रसंगी रोटेरियन रमेश तिवारी (सहाय्यक गव्हर्नर २०२५-२६), अजय मेनन (राज्यपालांचे विशेष प्रतिनिधी), इरफान झाकी (मावळते अध्यक्ष २०२४-२५) आणि जितेंद्र प्रसाद (मावळते सचिव) यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी क्लब ऑफ बार्देझ कोस्टलच्या सामुदायिक सेवेवर भर देणाऱ्या फेलोशिपने मेळाव्याचा समारोप झाला.