गोवा खबर : सुरईश संस्थेतर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या (आयएमबी) सहयोगाने शनिवार १२ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता इन्स्टिट्यूट ब्रागांझाच्या मुख्य सभागृहात, आषाढातील पावसासंगे भक्तिरसाची उधळ करणारा ‘अवघा रंग एक झाला’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
यात देश विदेशात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या मैफली केलेल्या प्रथितयश गायिका विदुषी सानिया पाटणकर (पुणे), सुर नवा ध्यास नवा.. या रियालिटी शो चा महागायक गोपाल गावंडे (अकोला) व गोव्यातील मधुर आवाजाची युवा गायिका नव्या भट वैविध्यपूर्ण अभंग रचना पेश करतील. त्यांना नितीन कोरगावकर (तबला), शिवानंद दाभोलकर (ऑर्गन), किशोर तेली (पखवाज), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर) व तारानाथ होलेगद्दे (तालवाद्य) हे कलाकार साथसंगत करतील. महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदक तथा रंगकर्मी प्रफुल्ल वालावलकर यांचे निवेदन असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाला जिनो फार्मास्युटिकल्स, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी (मल्टी स्टेट), राजदीप बिल्डर्स, ला ग्रॅण्ड व कॉपरलीफ हॉटेल यांचे पाठबळ लाभले आहे.


सानिया पाटणकर
जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका व पंडिता डॉ.अश्विनी भिडे देशपांडे यांच्या ज्येष्ठ शिष्या सानिया पाटणकर यांनी देशातील प्रतिष्ठेच्या संगीत महोत्सवाबरोबरच,स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, निदरलँड अशा अनेक देशात मैफली केल्या आहेत. सुरवातीला लिलाताई घारपुरे यांच्याकडे त्या गायन शिकल्या. माणिकताई भिडे , डॉ. अरविंद थत्ते, डॉ. मिलिंद मालशे या बुजुर्गांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले आहे. पंडित डी. व्ही. पलुस्कर, बालगंधर्व, उस्ताद अल्लादियाखान व पंडित मल्लिकार्जुन मन्सूर अशा थोर गायकांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
गोपाल गावंडे
युवा प्रतिभाशाली गायक गोपाल गावंडे याला प्रसिद्ध गायक महेश काळे यांचे शिष्यत्व लाभले आहे. बालपणी झालेले भजन, कीर्तनाचे संस्कार यातून तो घडला. संगीतात तो पी एचडी करत आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक कार्यक्रमातून त्याने रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली आहे.
नव्या भट
नव्या ही कुडचडे येथील सिटीएन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ऋषिकेश देसाई यांच्याकडे वयाच्या आठव्या वर्षापासून ती शास्त्रीय गायन शिकत आहे. गांधर्व महाविद्यालयात मंडळाची ती संगीत विशारद आहे. युनेस्को आणि अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आयोजित राष्ट्रीय गुणवत्ता शोध संगीत स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उपशास्त्रीय गायनात प्रथम व सुगणगायनात द्वितीय पुरस्कार तिने प्राप्त केला आहे. गोमंत कला असोसिएशन मडगाव आयोजित अभिनव गोमंत संगीत महोत्सवात २०२३ व २०२४ अशी सलग दोन वर्षे
नव्याने सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार पटकावला आहे.२०२३ मध्ये या महोत्सवात ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की महागुरू होते व नव्या त्यांच्या प्रशंसेस पात्र ठरली.