Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाच्या संसदेला केले संबोधित

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेत आयोजित विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. घानाच्या संसदेचे अध्यक्ष अल्बन किंग्सफर्ड सुमाना बॅगबिन यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला, घाना आणि भारताचे संसद सदस्य, शासकीय अधिकारी यांच्यासह निमंत्रित मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

या संबोधनाच्या माध्यमातून  भारत आणि घानामधील परस्पर संबंधांनी एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला. या संबोधनातून दोन्ही देशांमधील परस्पर आदर, सन्मान तसेच दोन्ही देशांना एकत्र आणणाऱ्या परस्पर सामायिक लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब उमटले.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून  स्वातंत्र्याचा सामायिक लढा आणि लोकशाही तसेच सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून दृढ झालेले भारत आणि घानामधील ऐतिहासिक संबंध ठळकपणे अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय सन्मानाला चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक संबोधत या सन्मानाबद्दल घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामानी महामा तसेच घानाच्या नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. घानाचे महान नेते डॉ. क्वामे नक्रुम्हा यांच्या योगदानाची दखल घेत, एकता, शांतता आणि न्याय ही मूल्ये आदर्श सशक्त आणि चिरस्थायी भागीदारीचा पाया आहेत यावर अधिक भर दिला.

घानाच्या उर्जावान संसदीय प्रणालीची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली आणि दोन्ही देशांच्या संसदेदरम्यान वाढत्या देवाणघेवाणीबद्दल समाधान व्यक्त केले. याच अनुषंगाने त्यांनी घाना-भारत संसदीय मैत्री सोसायटीच्या स्थापनेचे स्वागत केले.