गोवा खबर : गोवा फुटबॉल असोसिएशन (GFA), वसुधैव कुटुंबकम सोशल वेल्फेअर ट्रस्ट, मैत्रेय संस्था आणि IAES ऑटो एक्स्पर्ट सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोवा मान्सून फुटबॉल प्रीमिअर लीग २०२५’ चे आयोजन १६ ते २० जुलै दरम्यान म्हापशातील धुळेर स्टेडियमवर करण्यात येणार आहे, अशी माहिती GFAचे अध्यक्ष डॉ. कायतानो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत २० वर्षांखालील GFA मान्यताप्राप्त १६ संघ सहभागी होणार असून, सामने ६-साइड नॉकआउट पद्धतीने आणि फिफा नियमांनुसार खेळवले जाणार आहेत. विजेत्या संघाला १ लाख रुपये आणि चषक, तर उपविजेत्याला ५० हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता, स्थानिक युवा फुटबॉलपटूंना व्यासपीठ देणारी आणि पावसाळी पर्यटनाला चालना देणारी ठरेल. यावेळी पारंपरिक लोकनृत्ये, लाइव्ह बँड परफॉर्मन्स, चित्रकला सादरीकरण, पर्यटन स्टॉल्स व फॅन झोनसारखे विविध उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे हा एक वेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.