Connect with us

गोवा खबर

गोवा स्टेट हेरिटेज २०२५ योजनेंतर्गत १२२ वास्तूंचे जतन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या सांस्कृतिक समृद्ध वारशाचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व खात्याच्या वतीने ‘गोवा स्टेट हेरिटेज २०२५’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने अंमलात आणल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यभरातील १२२ हेरिटेज स्वरूपातील वास्तूंची निवड करण्यात आली आहे. या घरांचे जतन, दुरुस्ती आणि देखभाल यासाठी सखोल आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

फळदेसाई यांनी स्पष्ट केले की, या योजनेत स्थानिकांचा अधिक सहभाग असावा यासाठी महसूल वाटपावर आधारित नवीन आर्थिक मॉडेल तयार करण्यात येणार आहे. पोर्तुगीजकालीन वास्तू म्हणजे केवळ घर नसून, गोव्याच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे जिवंत साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करून पर्यटन व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हाच सरकारचा उद्देश आहे.

योजनेअंतर्गत पारंपरिक लोकगीते, लोकनृत्ये आणि खाद्यसंस्कृती जपण्यावरही भर देण्यात येणार आहे. हे ज्ञान आणि परंपरा जतन करून नव्या पिढीला त्याचे महत्त्व पटवून देण्याचा सरकारचा मानस आहे. या पत्रकार परिषदेला खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.