Connect with us

गोवा खबर

गोव्यातील मोटरसायकल पायलटांचे संरक्षण करा : युरी आलेमाव

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील मोटरसायकल पायलटांच्या सेवेवर बंदी आणण्याचा न्यायालयीन आदेश येण्यापूर्वी, सरकारने सक्रियपणे पुढे येवून पारंपरिक ‘मोटरसायकल पायलटांचे’ संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी शुक्रवारी केले.

कर्नाटकमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात आल्याच्या संदर्भात, काँग्रेस नेते युरी अलेमाव यांनी म्हटले की, अशा परिस्थितीत परंपरागत ‘मोटरसायकल पायलट’ यांना त्रास होऊ नये.

‘‘कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बाईक टॅक्सींबद्दलच्या आदेशाचा विचार करत आणि या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांवर लक्ष देत, गोवा सरकारने आमच्या पारंपरिक ‘मोटरसायकल पायलटांचे’ संरक्षण करण्यासाठी आणि ही सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रियपणे पुढे यावे. ही सेवा न्यायालयाच्या कोणत्याही बंदीच्या आदेशाकडून संरक्षित असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले.

आलेमाव यांनी सांगितले की, सरकारने या पारंपरिक मोटरसायकल पायलट सेवेला एक वैध व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, जिथे हजारो लोक स्वरोजगारात आहेत.

‘‘गोव्यातील मोटरसायकल पायलट्स, किंवा अन्य राज्यांतील बाईक टॅक्सिस, प्रवाशांसाठी कमी खर्चिक पर्याय राहिले आहेत, त्यामुळे या सेवेचा मोठा वापर केला जातो. गोव्यातील मोटरसायकल पायलटस त्यांच्या चांगल्या सेवेसाठी ओळखले जातात,’’ असे त्यांनी पुढे म्हटले.

 “बाईक टॅक्सीसाठी स्पष्ट नियामक संरचनेच्या अभावामुळे न्यायालय या सेवेवर बंदी घालत आहे. ही बंदी हजारो लोकांचे जीवन आणि उपजीविकेवर नकारात्मक प्रभाव टाकते. यासाठी हा व्यवसाय सुरक्षीत ठेवणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

‘‘आमचे गोमंतकिय ‘मोटारसायकल पायलट’ विश्वास आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. त्यांची संख्या हजारांच्या घरात असून या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्न अगोदरच हाताळला पाहिजे आणि न्यायालयाकडून प्रतिकूल हस्तक्षेप होऊ शकतो, अशी कमतरता भरून काढली पाहिजे,’ असे आलेमाव म्हणाले.

येत्या विधानसभा अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित करणार असून पारंपरिक मोटारसायकल पायलटांची उपजीविका वाचविण्यासाठी सर्व आमदारांचा पाठिंबा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.