गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा, १९८२ अंतर्गत ‘सी’ श्रेणीचे हॉटेल म्हणून नोंदणीकृत असलेल्या हॉटेल महादेवची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे निर्देश देणारी सूचना जारी केली आहे.
हल्लीच घडलेल्या बाल शोषण आणि अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांशी संबंधित गंभीर चिंताजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. नोंदणीकृत पर्यटन संस्थांकडून अपेक्षित असलेली सुरक्षा, जबाबदारी आणि कायदेशीर पालनाची मानके राखण्यात, सदर आस्थापन अपयशी ठरल्याची गंभीर दखल घेत, पर्यटन संचालकांनी नोंदणी सुविधा केंद्राच्या (आरएफसी) प्रकल्प व्यवस्थापकांना य हॉटेलची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, राज्यातील पर्यटनाशी संबंधित सर्व आस्थापने जबाबदारीने आणि कायद्याचे पूर्ण पालन करून चालतील, याची खात्री करण्यासाठी पर्यटन खाते वचनबद्ध आहे. कोणत्याही उल्लंघनावर, विशेषतः महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांवर, कडक कारवाई केली जाईल, असे पर्यटन संचालकांनी सांगितले.
गोव्यातील पर्यटन क्षेत्रात सुरक्षितता, सचोटी आणि सामाजिक जबाबदारीचे सर्वोच्च नियम पाळले जात आहेत, याची खात्री करण्यासाठी पर्यटन खाते कायदा अंमलबजावणी संस्था आणि संबंधित भागधारकांशी जवळून समन्वय साधत काम करत आहे. सर्व पर्यटक आणि रहिवाशांची, विशेषतः अल्पवयीन मुलांची सुरक्षा आणि कल्याण हे खात्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे.