Connect with us

गोवा खबर

कळंगुटकरांचा सन्मान म्हणजे गोमंतकीय परंपरेचा सन्मान : कलशावकर

Published

on

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक भालचंद्र कळंगुटकर यांचा गौरव करताना जि. पं. सदस्य रंगनाथ कलशावकर. सोबत सरपंच अनिता साळगावकर, सरपंच तुळशीदास गावस, अरुण पार्सेकर, कृष्णा पालयेकर, महादेव गवंडी, भगवान शेटकर व इतर.
Spread the love

गोवा खबर : भालचंद्र कळंगुटकर हे नाटक करणारे कलाकार नाहीत, ते नाटक ‘जगणारे’ कलाकार आहेत. त्यांनी रंगभूमीला केवळ व्यासपीठ न समजता तीच आपली साधना समजली. एक व्यसंगी कलाकार म्हणून त्यांचा परिचय समस्त गोमंत किया जनतेला आहे. त्यांच्या कलामध्ये एक प्रामाणिक तपश्चर्या आहे. अशा साधकाचा गौरव म्हणजे गोव्याच्या रंगभूमीचा व गोमंतकीय परंपरेचा सन्मान आहे. नवचेतना युवक संघाने हा गौरव सोहळा घेऊन केवळ सन्मान केला नाही, तर नव्या पिढीला एक आदर्श दिला आहे, असे प्रतिपादन हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी केले.

नवचेतना युवक संघ पेडणे व फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, ज्येष्ठ नाट्य कलाकार तथा मूर्ती कलाकार भालचंद्र कळंगुटकर यांच्या गौरव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे या नात्याने रंगनाथ कलशावकर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत तुये पंचायतीच्या सरपंच अनिता साळगावकर, चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस, माजी पंच अरुण पार्सेकर, नाट्य कलाकार भगवान शेटकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, दिलीप कवठणकर उपस्थित होते.

कळंगुटकर राज्य पुरस्कारापासून अजूनही वंचित

नाट्यकर्मी रंगनाथ कलशावकर यांनी संपूर्ण गोव्यात तसेच महाराष्ट्र राज्यात आपल्या नाट्यकलेतून आपला ठसा जनमानसात निर्माण केलेला आहे .मात्र त्याची दखल आज पर्यंत सरकारी पातळीवर घेण्यात आले नाही. याची खंत आजही आहे. त्यांचे चिरंजीव दीपक काळंगुटकर हे राजकारणी असून सुद्धा आपल्या वडिलांसाठी त्यांनी कधी राज्यकर्त्यांकडे शिफारस केली नाही .आणि सरकारचा राज्य पुरस्कार आपल्या वडिलांना दिला नाही . मात्र भालचंद्र कळंगुटकर हे प्रत्येकाच्या हृदयात आणि समस्त पेडणेवासियांच्या आणि गोमंतकीयांच्या मनात राहणार आहेत .त्यांनी नाट्य क्षेत्राला दिलेले योगदान हे न विसरता येण्यासारखी आहे. आमच्यासाठी ते नेहमीच प्रेरणादायी असून त्यांच्यामुळेच आज आम्ही रंगभूमीची सेवा करू शकलो असे रंगनाथ कलशावकर म्हणाले.

कळंगुटकर म्हणजे गोमंतकीय संस्कृतीचा आत्मा

सरपंच तुळशीदास गावस म्हणाले की, भालचंद्र कळंगुटकर हे केवळ कलाकार नाहीत, तर ते एक संपूर्ण संस्कृतीचे जीवंत रूप आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक श्वास हा रंगभूमीच्या सेवेसाठी समर्पित झाला आहे. रंगभूमीवर त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र, प्रत्येक संवाद, प्रत्येक हावभाव हा केवळ अभिनय नव्हता, ती होती एक भावनिक आणि आत्मिक साधना. आज जेव्हा आपण त्यांचा गौरव करत आहोत, तेव्हा आपण केवळ एका कलाकाराचा सन्मान करत नाही, तर आपण गोमंतकीय संस्कृतीचा, तिच्या वैभवशाली परंपरेचा आणि तिच्या आत्म्याचा सन्मान करत आहोत. कळंगुटकर यांनी स्थानिक पातळीवरील रंगभूमीला राज्याच्या आणि राज्याबाहेरील मंचावर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.  

याप्रसंगी सरपंच अनिता साळगावकर यांनीही आपले विचार व्यक्त करून भालचंद्र कळंगुळकर यांच्या पुढील जीवनासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भालचंद्र कळंगुटकर यांनी गौरवाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आपण केवळ रंगभूमीचा शिलेदार आहे. पेडण्याच्या मातीतूनच आपल्याला प्रेरणा मिळाली. ही भूमीच आपली खरी नाट्यशाळा आहे. ही भूमी, हे लोक आणि त्यांच्या मनातील कला हीच आपल्यासाठी खरी प्रेरणा आहे असे सांगून त्यांनी आपला गौरव केल्याबद्दल नवचेतना युवक संघ व फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे आभार मानले.

स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. महादेव गवंडी यांनी सूत्रसंचालन केले तर भगवान शेटकर यांनी आभार मानले.