गोवा खबर : राज्यपालपी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांच्या “खुशाल कल्याण यात्रेच्या” चौथ्या फेरीत उत्तर गोव्यातील पेडणे येथील पार्से, डिचोली येथील कासारपाल, वाळपई आणि बार्देश तालुक्यातील बेती येथे भेट दिली. गोव्याच्या पहिल्या महिला रीता श्रीधरन पिल्लई राज्यपालांसोबत होत्या.
राज्यपालांनी त्यांच्या यात्रेची सुरुवात पार्से पेडणे येथील भगवती मंदिराला भेट देऊन केली. आमदार प्रविण आर्लेकर यांनी त्यांचे स्वागत केले. भगवती मंदिराच्या वतीने खजिनदार आनंद राव देसाई आणि मंगुईश देसाई, शामसुंदर नाईक देसाई, सुरेंद्र देसाई यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ अर्पण केले.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि गोव्याच्या प्रथम महिला रीता श्रीधरन पिल्लई यांनी भगवती मंदिरात प्रार्थना केली.
राज्यपालांचा आमदार प्रवीण आर्लेकर आणि पार्से गावचे सरपंच अजय कळंगुटकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर, राज्यपालांनी पार्से पेडणे येथील हुतात्मा चौकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
डिचोली तालुक्यातील कासारपाल येथील देवी महामाया कालिका मंदिरात राज्यपालांचे आगमन होताच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आणि गोव्याच्या प्रथम महिला रीता श्रीधरन पिल्लई यांनी श्रीदेवी महामाया कालिका मंदिरात प्रार्थना केली.
तद्नंतर राज्यपालांनी वाळपई येथील हनुमान मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलीप कर्पे, वाळपईच्या नगराध्यक्षा प्रसन्ना गावस, तुळशीदास काणेकर आणि इतर उपस्थित होते.
वाळपई येथील झामिया मशिदीत आगमन झाल्यावर अध्यक्ष खुदबुद्दीन शाह, अखतार शाह आणि इतरांनी राज्यपालांचे स्वागत केले. मौलाना यांनी राज्यपालांच्या वतीने मशिदीत प्रार्थना केली. नंतर, राज्यपालांनी वाळपई येथील अवर लेडी ऑफ लुर्ड्स चर्चला भेट दिली आणि प्रार्थना केली.
पेरीश पुजारी फादर विन्स्टन बार्बोझा यांनी राज्यपालांचे स्वागत केले. या कार्यक्रमात सहाय्यक पुजारी फादर रॉबर्ट, फादर अॅग्नेलो फर्नांडिस, फादर लॉरेन्स आणि इतर उपस्थित होते. त्यांच्या यात्रेदरम्यान राज्यपालांनी बार्देश तालुक्यातील बेती येथील गुरुद्वारालाही भेट दिली.
खुशाल कल्याण यात्रेदरम्यान राज्यपालांनी भेट दिलेल्या सर्व प्रार्थनास्थळांवर प्रार्थना केली आणि गोव्यातील लोक आणि राष्ट्राच्या शांती, आनंद आणि कल्याणासाठी दैवी आशीर्वाद घेतले.
राज्यपालांनी आज भेट दिलेल्या सर्व पवित्र स्थळांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा धनादेश प्रदान केला.
राज्यपालांसोबत राज्यपालांचे सचिव श्री संजीव गांवस देसाई, राज्यपालांचे विशेष अधिकारी आर. मिहिर वर्धन, इतिहासकार संजीव सरदेसाई आणि राज्यपालांचे अधिकारी ए. कल्याण हर्ष व इतर मान्यवर होते.