Connect with us

गोवा खबर

गोव्यात दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत तपासणी शिबिरे

Published

on

Spread the love

गोवा खबर : दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय यांनी भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (अलिम्को) यांच्या सहकार्याने २० मे २०२५ रोजी सांगे तालुक्यात एक मोफत तपासणी शिबिर आयोजित केले होते.

आवश्यक उपकरण-साधनांची गरज असलेल्या दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत अशलेल्या व्यापक राज्यव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व १२ तालुक्यांत अशी मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

या शिबिराचे उद्घाटन दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर; दिव्यांगजन सक्षमीकरण संचालक वर्षा नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

सांगे तालुक्यातील शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सरकारची वचनबद्धता या उपक्रमातून प्रतिबिंबित होत आहे. दिव्यांग व्यक्तींच्या विशिष्ट गरजा जाणून घेणे आणि त्यांना सुलभपणे हालचाल करता येईल, काम करता येईल व त्याद्वारे त्यांना दैनंदिन जीवनात सहभाग वाढेल, प्रतिष्ठा वाढेल यासाठी आवश्यक साधन-उपकरणे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट या शिबिरांमागे आम्ही ठेवले आहे.

राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ गोवा निर्माण करण्याच्या दिशेने ही दिव्यंगत्व मूल्यांकन शिबिरे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहेत. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगण्याची संधी मिळावी, हे सुनिश्चित करणे आमचे ध्येय आहे. या शिबिरातून दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखण्यास मदत होते, त्याचबरोबर दिव्यंगत्व आणि सक्षमीकरण यातील दरी भरून काढण्यासाठी त्यांना वेळेवर मदत देणे आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या आधारे आवश्यक साधने-उपकरणे उपलब्ध करून देणे याबाबतची आमची वचनबद्धताही ठळकपणे अधोरेखित होते.

सांगे येथील शिबिरास लाभलेल्या प्रतिसादानंतर, २३ मे २०२५ रोजी कुडचडे येथे तिसरे तपासणी शिबिर होणार आहे.

या शिबिरांचे आगामी वेळापत्रक खालीलप्रमाणे:

• २२ मे – शासकीय विद्यालय, काणकोण

• २३ मे – चेतना एज्युकेशन सोसायटी, कुडचडे

• २४ मे – अवर लेडी ऑफ पाएटी हायस्कूल, कुळें, धारबांदोडा

• २५ मे – फोंडा क्रीडा संकुल, फोंडा

• २६ मे – फार्मसी कॉलेज, पणजी

• २७ मे – संजय सेंटर स्कूल, वास्को

• २८ मे – रवींद्र भवन, मडगाव

• ३० मे – मॅरेज हॉल, वाळपई बसस्थानक परिसर, वाळपई

• ३१ मे – सोहिरोबानाथ अंबिये महाविद्यालय, पेडणे

• १ जून – पेडे क्रीडा संकुल, म्हापसा

• २ जून – रवींद्र भवन, साखळी

अलिमकोच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींचे दिव्यंगत्व मूल्यांकन करणे आणि भविष्यात त्यांना आवश्यक व सहाय्यक उपकरणांचे वितरण सुलभ करण्याबाबत अलिमको महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. गोव्यातील दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक साहाय्य निश्चित करण्याबाबतची गोवा शासनाची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित होते.