गोवा खबर : भारतातील सर्वात मोठ्या समावेशक ट्रेक टीमचा भाग असलेल्या आणि अतीशय आव्हानात्मक असलेला अन्नपूर्णा बेस कॅम्प (एबीसी) ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या पथकामध्ये गोवा राज्यातून सहभागी झालेले आयोजक आणि सहभागी प्रतिनिधी यांनी दाखवलेले धैर्य, साहस आणि सर्वसमावेशकतेची भावना या गुणांची दखल घेत राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या चमूने १८ एप्रिल २०२५ रोजी अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला होता.
या ऐतिहासिक कामगिरीचे नेतृत्व गोवास्थित टिंकेश अॅबिलिटी फाउंडेशन (टीएएफ)चे टिंकेश कौशिक यांनी एडव्हेंचर पार्टनर अद्वैत आउटडोअर्स यांच्या सहकार्याने केले. भारतातील दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या समावेशकता चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या कामिगिरीचे कौतुक केले जात आहे. संधी आणि पाठबळ मिळाले तर कोणतीही मोहीम अवघड राहत नाही, किंवा कोणत्याही पर्वतशिखरावर पोचता येते हा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवत या मोहिमेने साहस या शब्दाची व्याख्या नव्याने परिभाषित केली आहे.
या कामागिरीबाबत राज्याचे दिव्यांजगन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, “दिव्यांग व्यक्तींना समान संधी, प्रवेश आणि प्रोत्साहन दिल्यास काय साध्य करता येते याचे एक ताजे उदाहरण म्हणजे टिंकेश अॅबिलिटी फाउंडेशनच्या नेतृत्वाखालील या समावेशक ट्रेक टीमने केलेली ही असाधारण कामगिरी होय. अन्नपूर्णा बेस कॅम्पपर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ एक शारिरीक समस्यांवरील मात यापुरता मर्यादित नाही, तर ही कामगिरी सर्वसमावेशकता, निर्धार आणि प्रत्येकामध्ये असलेली अमर्याद क्षमता दर्शविणारा यशस्वी प्रयत्न आहे.”
या सत्कार कार्यक्रमादरम्यान मुख्य ट्रेकिंग टीमच्या साहसाचे कौतुक करण्यात आले. या पथकामध्ये खालील प्रतिनिधींचा सहभाग होता:
• टिंकेश, जगातील पहिला ट्रिपल एम्प्युटी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकर आणि मोहिमेचा नेता
• रितेश वायंगणकर, ८८ टक्के गंभीर दिव्यंगत्व असलेली व अपघातामध्ये उजवा पाय गमावलेली व्यक्ती, गोवा
• रचित, एक हात नसलेला आणि तीन वेळा कर्करोगाचा सामना केलेला प्रतिनिधी, पुणे
• गोविंद, जन्मजात एका हात आखुड असलेला प्रतिनिधी, उदयपूर
• दीपेंद्र, एक हात नसलेला व प्रथमच ट्रेकिंगचा अनुभव घेणारा प्रतिनिधी, जयपूर
• नितीन, गुडघ्यावरून दिव्यंगत्व असलेला व प्रथमच ट्रेकिंग करणारा प्रतिनिधी, बेंगळुरू
त्यांच्यासोबत सहभागी झालेले सिडेनस्ट्रिका (टीएएफ संस्थापक आणि अध्यक्ष), सुदर्शन, अंशुल, निकित, सुधाकर, गिरीश, मनीषा आणि शिवानी यांच्यासह उत्साही, व दिव्यांग नसलेल्या सहकाऱ्यांनी समावेशकतेच्या विचाराला प्रोत्साहन आणि पाठबळ दर्शविले. अद्वैत आउटडोअर्सचे संस्थापक ललित यादव यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. समावेशक साहसी उपक्रमाबाबत त्यांची कटिबद्धता या मोहिमेमध्ये महत्वाची ठरली.
“ही मोहीम केवळ अन्नपूर्णा बेस कॅम्पवर पोचण्यापुरती मर्यादित नव्हती. जेव्हा आपण सर्वसमावेशकतेला एका संकल्पनेतून कृतीत आणतो तेव्हा काय होते हे आम्हाला या मोहिमेतून दाखवायचे होते,” अशी माहिती टिंकेश कौशिक यांनी दिली. ते पुढे म्हणाले. “आम्ही उचललेले प्रत्येक पाऊल दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी, सहभागसुलभतेसाठी आणि सक्षमीकरणासाठी एक पाऊल आहे.”
८८ टक्के गंभीर दिव्यंगत्व असलेली व्यक्ती व अपघातामध्ये उजवा पाय गमवावा लागलेले डिचोली येथील रितेश वायंगणकर यांनी अन्नपूर्णा बेस कॅम्पपर्यंत यशस्वीरित्या चढाई केली. केवळ ४ दिवसांत बेस कॅम्पपर्यंत चढण्यासाठी संपूर्ण ७५ किमीचा मार्ग त्यांनी पार करत उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
या यशस्वी चढाईनंतर, टिंकेशसह चार ट्रेकरनी नेपाळमधील द क्लिफ या जगातील सर्वात उंच कड्यावरही चढाई करत शक्यतांच्या सीमा विस्तारित केल्या. २२८ मीटर स्विंग बंजी जंप पूर्ण करत टिंकेश यांनी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला ट्रिपल एम्प्युटी म्हणून मान पटकावला. यापूर्वीचा १६५ मीटरचा आपला विक्रम मोडत त्यांनी मर्यादा या मनातच अस्तित्वात असतात हे दाखवून दिले.